Maharashtra Budget Session 2025 – धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहाबाहेर केली, हा सभागृहाचा अवमान; विधानसभेत विरोधी पक्षांचा सभात्याग
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून विधानसभेत आज विरोधी पक्षांनी महायुती सरकारला घेरलं. जयंत पाटील, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसह महायुती सरकारला धारेवर धरले. सरकारने सभागृहाचा अवमान केला आहे, असे म्हणत संतप्त झालेल्या विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
आपल्या राज्याच्या एका मंत्र्याने राजीनामा दिलेला आहे. पण अजूनही सभागृहामध्ये आम्हाला सरकारच्या वतीने याबद्दल कुठेही अवगत केलं गेलं नाही. बाहेर घोषणा झाली. हा एक प्रकारचा सभागृहाचा अवमान करण्याचं काम होत आहे. सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे का? हे आम्हाला सभागृहात अवगत केलं पाहिजे ही आमची मागणी आहे, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडही आक्रमक झाले. सभागृहाचे अधिकार काय आहेत. सभागृहाला माहितीच नाही काय चाललंय? सभागृहाचा सन्मान, इज्जत काही नाही का? असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी तालिका अध्यक्षांना केले. सभागृहात अशा प्रकारचं नोटिफिकेशन देण्याची पद्धत नाही. अशी प्रथा नाही. स्वतंत्र नोटिफिकेशन काढण्यात येईल, असे तालिका अध्यक्ष म्हणाले.
तालिकेवर जे बसलेले अधिकारी आहेत ते चुकीची माहिती देत आहेत. मंत्रिमंडळातील सदस्याचा राजीनामा झाला, हा बाहेर जाहीर झाला. ज्याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे ती अद्याप दिली गेली नाही. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सभागृहात जाहीर झाल्यानंतर मग माध्यमांना माहिती देण्यात येते. स्वतः मंत्र्यांनी सांगितलं तर समजू शकतो. पण मुख्यमंत्री बाहेर माध्यमांना सांगतात की त्यांचा राजीनामा झाला आहे. आणि त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे आणि पदमुक्त केलेलं आहे, असे ते म्हणाले. ते इथे सांगायला पाहिजे होतं. त्यामुळे हा सभागृहाचा अवमान होतो. आणि अवमान झाला तरी तालिकेवरचे अधिकारी तुम्हाला चुकीची माहिती देताहेत. चुकीचे पायंडे, चुकीचे नियम, चुकीची व्यवस्था या सभागृहात तयार व्हायला लागल्या आहेत. मग मंत्र्यांचा परिचय देण्याचीही आवश्यकता नाही, असे आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले.
विरोधक आक्रमक झाल्यानंतर तालिका अध्यक्षांनी पुन्हा माहिती दिली. सभागृहाची प्रथा नाही तरी देखील तपासून आम्ही रुलिंग देतो, असे तालिका अध्यक्ष म्हणाले. तालिका अध्यक्षांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधी पक्षांनी सभात्याग केला. विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीवेळी सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पण यावेळी सरकारकडून कुठलेही उत्तर देण्यात आले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List