भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून मराठी माणूस पेटून उठला, अनाजी पंतांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा! उद्धव ठाकरे कडाडले
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणारा प्रशांत कोरटकर हा चिल्लर माणूस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मग आता मराठी भाषेचा अवमान करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी हा माणूसही चिल्लर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे आणि त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कडाडले. घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईत राहणाऱयाला मराठी भाषा आलीच पाहिजे असे नाही, या भैयाजी जोशी यांच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले. मराठी माणूस याविरोधात पेटून उठला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतही रणकंदन झाले.
उद्धव ठाकरे यांनी विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना भैयाजी जोशींचा चांगलाच समाचार घेतला. भैयाजींनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी भैयाजींचा अनाजीपंत असा उल्लेखही केला. महायुती सरकारने आमदारांसाठी छावा चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. त्या शोला गद्दार लोक गेलेच नव्हते, पण इतर लोक छावा बघत असताना या काळातील अनाजीपंत इकडे येऊन मराठी-अमराठी असे विष कालवून गेले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांच्यावर केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, पण महाराष्ट्रात फूट पाडणारे औरंगजेब आणि त्यांना मदत करणारे अनाजीपंत मात्र याही काळात जन्माला आले आणि येत आहेत यासारखे दुर्दैव नाही, असे ते म्हणाले.
ब्रह्मदेवांना आम्हीच जन्म दिला, अशा तोऱ्यात जगभर ब्रह्मज्ञान सांगत काही लोकं फिरत असतात. भैयाजींची मातृभाषा कोणती आहे माहीत नाही, पण ते अनाजीपंत मुंबईत येऊन द्वेषाचे गोमूत्र शिंपडून गेले, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, हा संघाचा व भाजपचा छुपा अजेंडा आहे. त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. बरेच दिवस त्यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान विषय काढलेला नाही. मग काय तर बटेंगे तो कटेंगे…म्हणजे केवळ हिंदू-मुसलमान नाही तर मराठी अमराठी, मराठीत पुन्हा मराठा -मराठेतर अशी वाटणी करायची आणि राज्य बळकवायचे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
हिंमत असेल तर गुजरात, तामीळनाडू, केरळ, कर्नाटकात अशी भाषा करून दाखवा
हिंमत असेल तर अनाजीपंतांनी अशी भाषा अहमदाबादमध्ये करून दाखवावी. तामीळनाडू, कर्नाटक, केरळ, बंगालमध्ये करून दाखवावी आणि सुखरूप परत येऊन दाखवावे, असे आव्हान यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. मराठी माणूस सहृदयी आहे, दयाशील आहे म्हणून कुणीही यावे आणि टपली मारून जावे अशी ही पद्धत आहे. मराठी माणूस आम्हालाच मते देणार, कुठे जाणार, असे भाजपला वाटतेय. ते मराठी माणसाला खिजगणतीतही धरत नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठीचे महत्त्व इंग्रजांना कळले, पण संघ-भाजपला नाही
मराठी भाषेचे महत्त्व संघ आणि भाजपला कळले नसेल, पण इंग्रजांना कळले होते, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यावेळी लोकमान्य टिळक यांच्या अग्रलेखाचे उदाहरणही दिले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेतून लिहिला होता, तसेच आम्ही सरकारला विचारतोय की तुमचे डोके ठिकाणावर आहे का, असे ते म्हणाले.
मातृभाषेबद्दल प्रेम असेल तर भैयाजी जोशींचा निषेध करा
भाजपने आता देशात उत्तर आणि दक्षिण असा भाषिक वाद सुरू केला आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यावेळी तामीळनाडूतील स्टालिन यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. भाजपा इंडियाचे हिंदीया करायला बघतेय, असा आरोप कमला हसन यांनीही केला असल्याचे ते म्हणाले. अशा वादाच्या ठिणग्या टाकून भारतमाता की जय बोलता येणार नाही, असे म्हणत मूळ भाजपचे नेते आणि त्यांच्यात सहभागी झालेले गद्दार यांना मातृभाषा मराठीबद्दल प्रेम असेल तर त्यांनी भैयाजी जोशींचा निषेध केलाच पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
हुतात्म्यांच्या बलिदानाची शपथ घेतो… मुंबईची वाटणी होऊ देणार नाही
महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज दुपारी हुतात्मा चौक येथे जाऊन हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. तुमच्या बलिदानाची शपथ घेतोय…कुणी कितीही विष कालवले तरी मराठी माणूस महाराष्ट्रापासून मुंबई कुणालाही हिसकावू देणार नाही, मुंबईची वाटणी होऊ देणार नाही, अशी शपथ यावेळी सर्वांनी घेतली.
सरकारचे उत्तर गोलमाल
देशाची भाषावार प्रांतरचना झाली. आता मुंबई तोडून गल्लीवार प्रांत रचना करताय का, असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला. मराठी भाषा सक्तीची करणारा कायदा महाविकास आघाडी सरकारने केला आहे. मराठी भाषा आली नाही तरी चालेल असे बोलणाऱया एकावर जरी त्या कायद्याचा बडगा उगारला तर इतर कुणाची मराठीचा अवमान करण्याची हिंमत होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आधी पिल्लू सोडायचे आणि मग ते पिल्लू मोठे झाले की खांद्यावर घ्यायचे आणि अंगलट आले की झिडकारून द्यायचे, अशी संघ आणि भाजपची नीती आहे असे ते म्हणाले. दोन्ही सभागृहांमध्ये भैयाजींच्या वक्तव्याबद्दल सरकारने गोलमाल उत्तरे दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
मराठी भाषा आली नाही तरी चालेल म्हणणाऱया अनाजीपंत भैयाजी जोशींवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करून दाखवावी. नाहीतर भाजप आणि संघाचा हा छुपा अजेंडा आहे असे मान्य करावे.
मुंबईत विष कालवू नका
राजधानी मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळाली आहे. त्यावेळी 105 नव्हे तर त्यापेक्षाही जास्त लोकांनी बलिदान दिले होते याचा उल्लेख ताया झिनकीन यांच्या पुस्तकात आहे. मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा मुंबईकर म्हणून आम्ही एकमेकांना वाचवायला पुढे जातो. 92-93 च्या दंगलीत गुजराती माणसांनाही हिंदू म्हणून वाचवणारी शिवसेना होती. कोरोनातही आम्ही सर्वांना आपलेपणाने जपले होते. त्यात साखर टाकायची नसेल तरी मीठाचा आणि विषाचा खडा टाकू नका. मुंबई विष कालवून जिंकू नका, असे उद्धव ठाकरे यांनी मुंबई व मराठीद्वेष्टय़ांना बजावले. शिवसेनेने याच मुंबईत रक्तदानाचा जागतिक विक्रम केला होता, तसे काम करून दाखवा, असे जाहीर आव्हानही त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिले.
माफी मागा भैयाजी… मुंबईची भाषा मराठीच आहे, आदित्य ठाकरे आक्रमक
मुंबईची भाषा मराठीच आहे असे छातीठोकपणे सांगत शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी, भैयाजी जोशी यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरोखरच महाराष्ट्राच्या मातीतले असतील तर त्यांनी याप्रकरणी कारवाई करावी, असेही ते म्हणाले. भाजपच्या पोटात होते ते ओठात आले. भाजपला मुंबई तोडायची आहे. मराठीला दूर करायचे आहे. मराठी लोकांना दूर करायचे आहे. म्हणूनच तर त्यांनी घाटकोपरमध्ये पराग शाहला उमेदवारी दिली, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. महायुती सरकारला मराठीबद्दल प्रेम नाही असे सांगताना आदित्य ठाकरे यांनी काही उदाहरणेही दिली. महाविकास आघाडी सरकार मरीन ड्राईव्हला मराठी भाषा भवन उभारणार होते, त्याला या सरकारने स्थगिती दिली. गिरगावमध्ये मराठी नाटय़ दालन करणार होतो त्यालाही स्थगिती दिली, असे आदित्य ठाकरे म्हणाले. कोश्यारी, कोरटकर, सोलापूरकर आपल्या महापुरुषांचा अपमान करतात, आपण ते किती सोसायचे याचा विचार आता करायला हवा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. मुंबईत लाखो लोक रोजगारासाठी बाहेरून येत असले तरी मुंबईची भाषा मराठीच आहे हे भैयाजी जोशी यांनी जाणून घ्यावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
जोशीबुवांनी काड्या करू नये -राज ठाकरे
भैयाजी जोशी यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज ठाकरे यांनीही प्रसारमाध्यमावर व्यक्त होत तोफ डागली. आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला. त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले. त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते. तर मग जोशी बुवांना हे समजू नये. या असल्या काडय़ा घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरून ध्यानात ठेवावे, अशा शब्दांत जोशी यांचा समाचार घेतला.
मुंबई तुटू देणार नाही!
उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुतात्मा स्मारक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन केले व आम्ही ही मुंबई तुटू देणार नाही, अशी शपथ घेतली. यावेळी शिवसेना नेते अॅड. अनिल परब, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, सचिन अहिर, कैलास पाटील, नितीन देशमुख, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
फडणवीस काय म्हणाले…
भैयाजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही. परंतु मुंबईची, महाराष्ट्राची, सरकारची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आले पाहिजे. याविषयी भैयाजी यांचे दुमत असेल असे वाटत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
भैयाजींचा फक्त खुलासा ना माफी, ना दिलगिरी
मी केलेल्या विधानामुळे गैरसमज झाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, असा खुलासा भैयाजी जोशी यांनी केला. त्यांनी विधानाबद्दल माफी किंवा दिलगिरी मात्र व्यक्त केली नाही. राजकारण सुरू आहे, त्यावर मी बोलणार नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List