बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
गुजरातमधील बडोदा शहरात शुक्रवारी पहाटे एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने भरधाव कारने काही दुचाकींना धडक दिली. या अपघातात एका दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला, तर चौघं जण जखमी झाले. या तरुणाने मद्यप्राशन केल्याचं पोलिसांनी सांगितलं. करेलीबाग परिसरातील मुक्तानंद चौकात हा अपघात झाला. त्यानंतर चालक रक्षित चौरसिया याला अटक करण्यात आली. चौरसियाला पकडणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं की, तो दारू पिऊन गाडी चालवत होता आणि गाडीततून बाहेर पडल्यानंतर “अनादर राऊंड, अनादर राऊंड” असं ओरडत होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री जान्हवी कपूरनेही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
बडोदा कार अपघाताची बातमी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत त्यावर जान्हवीने लिहिलं, ‘हे भयावह आणि संतापजनक आहे. अशा प्रकारच्या वागण्याने सुटका होईल असं कोणालाही वाटणंच मला त्रासदायक वाटतंय. मग ती व्यक्ती नशेत असो वा नसो.’ बडोदा कार अपघातातील मृत महिलेचं नाव हेमाली पटेल असं आहे. चौरसिया मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी आहे. तो कायद्याचा विद्यार्थी असून पेईंग गेस्ट म्हणून एका ठिकाणी राहत होता. ही कार त्याचा मित्र मित चौहानची होती, जो चालकाच्या बाजूच्या आसनावर बसला होता. अपघातानंतर तो पळून गेला, असं पोलिसांनी सांगितलं. पोलीस मितचा शोध घेत आहेत.
माध्यमांमध्ये दाखवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरधाव वेगाने येणारी कार दोन स्कूटरना धडकताना आणि त्यावरील प्रवाशांना खाली पाडून त्यांना ओढत घेऊन जाताना दिसत आहे. पोलिसांनी आरोपी रक्षित चौरसियाविरुद्ध मद्यपान करून गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्याने असा दावा केलाय की अपघाताच्या रात्री तो मद्यधुंद नव्हता. या घटनेबाबत विविध स्तरांतून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. अशा आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवण्याची त्यांची हिंमत होणार नाही, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List