विकृत चाळे करणाऱ्या गौरव आहुजाची मस्ती उतरली, वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी केली अटक
आलिशान मोटारीतून जाताना मद्यधुंद तरुणाने येरवड्यातील शास्त्री नगर चौकात रस्त्यालगत गाडी थांबवून लघुशंका केली होती. त्याचा जाब विचारणाऱ्यासोबत त्याने विकृत अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करीत आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी भाग्येश ओसवाल याला शनिवारी अटक केली होती. पसार आरोपी गौरव आहुजाला रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास अटक केली.
सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्या प्रकरणी गौरव मनोज आहुजा (25, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) भाग्येश प्रकाश ओसवाल (22, रा. मार्पेटयार्ड) यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला होता. पसार झालेला गौरव पोलिसांना मिळाला नव्हता. त्याने शनिवारी रात्रीच्या सुमारास कराड गाठून पोलिसांच्या स्वाधीन झाला. दरम्यान, शास्त्री नगर चौकात मधोमध मोटार थांबवून गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश मद्यप्राशन करत होते. गौरवने मोटारीतून खाली उतरून लघुशंका केली. हे दोघेही चौकात हुल्लडबाजी करीत असताना नागरिकांनी त्यांना जाब विचारला. त्या वेळी त्यांनी नागरिकांसोबत वादविवाद करून अश्लील वर्तन केले.
पिझ्झा देण्यासाठी आले नातलग
आलिशान गाडी रस्त्यात थांबवून मद्यधुंद आरोपी गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, शनिवारी रात्री 11.30 वाजता भाग्येश ओसवाल या आरोपीला पिझ्झा व कोल्ड ड्रिंक्स देण्यासाठी नातेवाईक पोलीस ठाण्यात गेले होते. बंदोबस्तासाठी तैनात अंमलदारांसह अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने संबंधितांना ठाण्याबाहेर हाकलून दिले.
मी चुकलो, मला एक संधी द्या!
विकृत चाळे केल्यानंतर पसार झालेल्या गौरव आहुजाला पश्चाताप झाला. त्यानंतर त्याने माफीचा व्हिडिओ तयार केला. मी चुकलो, मला एक संधी द्या, अशी विनवणी केली. त्यानंतर गौरव रात्री कराड पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर तो रविवारी मध्यरात्री येरवडा पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याची वैद्यकीय तपासणी करून रविवारी सकाळी आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
आरोपी कोल्हापूरपर्यंत असा पोहोचला…
लघुशंकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कारवाईच्या भीतीने आरोपी गौरव आहुजा कोल्हापूरकडे गेला. त्याने त्याची अलिशान मोटार कोल्हापूरनजीक उभी केली. त्यानंतर रिक्षाचालकाकडे मोटार भाड्याने मिळेल का, अशी विचारणा केली. रिक्षाचालकाने त्याला मोटारीची व्यवस्था करून दिली. संकेश्वरपर्यंत मोटार गेल्यानंतर गौरवने संबंधित मोटार चालकाला पुन्हा मोटार पुण्याकडे वळविण्यास सांगितले. येरवड्याला सोडा, असे त्याने सांगितले. मोटार चालकाच्या मदतीने गौरवने माफी मागतानाची व्हिडिओ तयार करून मित्राला पाठविला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List