होळी वर्षातून एकदा, तर जुम्माची नमाज 52 वेळा येते; रंगाचा त्रास होत असेल तर घराबाहेर पडू नका, UP पोलिसांच्या विधानानं वाद
उत्तर प्रदेशमधील संभल गेल्या नोव्हेंबरपासून चर्चेत आहे. मशिदीच्या सर्वेक्षणावरून येथे हिंसाचार उफाळून आला होता. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून होळी आणि रमजानचा सण शांततेत साजरा व्हावा म्हणून कोतवालीमध्ये शांती समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला हिंदू-मुस्लिमसह अन्य समाजाचे लोकही उपस्थित होते. यावेळी सर्कल ऑफिसर अनुज चौधरी यांचे केलेले एक विधान सध्या वादाचे कारण ठरले आहे.
होळीचा सण 14 मार्चला (शुक्रवार) आहे. याच दिवशी रमजान महिन्यातील जुम्माची नमाजही अदा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना सर्कल ऑफिसर अनुज चौधरी एक विधान केले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘होळीचा सण वर्षातून एकदाच येतो. तर जुम्माची नमाज (दर शुक्रवारी होणारी नमाज) वर्षातून 52 वेळा होते. अशामुळे जर रंगांचा त्रास होत असेल तर त्या दिवशी घराबाहेर पडू नका आणि जर घराबाहेर निघालाच तर मोठ्या मनाने निघा.’
मुस्लिम समाज ज्याप्रमाणे वर्षभर ईदची वाट पाहत असतो, तसेच हिंदू समाजही होळीची वर्षभर वाट पाहतो. एकमेकांना रंग लावून, गोडधोड खाऊ घालून आणि ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत साजरी केली जाते. ईदलाही शेवया बनवल्या जातात, एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या जातात. सणवार मिळून मिसळून साजरे केल्यानेच समाजात एकोपा निर्माण होतो. त्यामुळे दोन्ही समाजातील लोकांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा. धार्मिक भावना दुखावतील असे वर्तन ठेऊ नये आणि बळंच कुणावर रंग उडवू नये, असे आवाहनही अनुज चौधरी यांनी केले. तसेच वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
#Sambhal– हमारे मुजफ्फरनगर के वासी संभल के दबंग CO अनुज चौधरी की दो टूक
जिन्हें रंग से ऐतराज, होली के दिन घर से न निकलें,
साल में 52 जुमे होते हैं और होली सिर्फ एक बार आती है।
होली को लेकर पीस कमेटी की मीटिंग में CO की सख्त चेतावनी…!@wrestleranuj @myogiadityanath #holi pic.twitter.com/BlNUl1RLgU
— विभोर अग्रवाल
(@IVibhorAggarwal) March 6, 2025
समाजवादी पार्टी टीका
दरम्यान, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांना मात्र अनुज चौधरी यांचे विधान रुचलेले नाही. पोलिसांनी भाजपच्या एजंटप्रमाणे वागू नये, अशी टीका सपाचे प्रवक्ते शरवेंद्र बिक्रम सिंह यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या नजरेत रहावे म्हणून अधिकारी अशी विधानं करतात. पक्षपाती विधाने करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, असेही ते म्हणाले.
पोलिसांचे विधान राजकीय – काँग्रेस
उत्तर प्रदेश काँग्रेस माध्यम समितीचे उपाध्यक्ष मनीष हिंदवी म्हणाले की, अधिकाऱ्याने धर्मनिरपेक्ष असावे, तरच प्रशासन चांगल्या पद्धतीने चालू शकते, अन्यथा अराजकता पसरू शकते. एखाद्या विशिष्ट धर्माच्या लोकांना रंग खेळल्याने त्रास होत असेल तर अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी भयमुक्त वातावरण बनवण्यास प्राधान्य दिले पाहिजे. एकीकडे होळीही साजरी झाली पाहिजे, आणि दुसरीकडे जुम्माची नमाजही शांततेत पार पडली पाहिजे. होळी वर्षातून एकदा येते आणि जुम्माची नमाज 52 वेळा येते. रंगाचा त्रास होत असेल तर घराबाहेर निघू नका, असे विधान राजकीय आहे. वोटबँकचे राजकारण करणारे असे विधान करतात. पोलीस अधिकाऱ्याचे विधान निषेधार्ह आहे, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List