थोडक्यात बातम्या – द्वारकानाथ संझगिरी यांच्या तैलचित्राचे उद्या अनावरण
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) तथा क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या तैलचित्राचे अनावरण म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन, मुंबई आणि विकासकर्मी अभियंता, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 10 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता अभियांत्रिकी संकुल, वरळी येथील प्रवेशद्वाराच्या प्रांगणात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण होणार आहे. यावेळी संझगिरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरांजली सभादेखील घेण्यात येणार आहे.
मुंबईत दहा दिवसीय दशावतार कार्यशाळा
राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख होण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दहा दिवसीय दशावतार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 8 मार्च ते 18 मार्च या कालावधीत संतोषी माता मंदिर, कुरार व्हिलेज मालाड पूर्व येथे होणार असून यामध्ये जिह्यातील 20 प्रशिक्षणार्थींची निवड होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून प्रयोगसिद्ध कलांची प्रशिक्षण शिबिरे व सत्रे यांचे आयोजन करण्यात येत आहे. दशावतार ही कोकणातील एक पारंपरिक लोकनाटय़ शैली आहे. मुंबईस्थित कलाप्रेमींना या कलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या कार्यशाळेतून देण्यात येणार आहे. दशावतार या रामायण व महाभारत यावर आधारित विविध घटना पात्रे यांचा परिचय देणारे तसेच कला, रंगभूषा, वेशभूषा, नृत्य, महिला पात्र, शब्दफेक, आवाजातील चढउतार, सादरीकरण यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही कार्यशाळा विनामूल्य असून सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी शिबीर संचालक रतन परब यांच्याशी 9702371753 या क्रमांकावर संपर्क साधा.
नेहरू सेंटरमध्ये कलाप्रदर्शन
वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये वॅक आर्ट कॉन्क्लेव्हच्या कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राजन जाधव, प्रवीण गांगुर्डे, गायतोंडे, मोगलन सावत्ती, ‘पद्मश्री’ सुधाकर ओलवे, भगवान रामपुरे, पद्मनाथ बेंद्रे यांच्यासह अन्य ख्यातनाम कलावंतांनी साकारलेल्या चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी आदी कला पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तरी नागरिकांनी या कलाप्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन डॉ. विजय कदम यांनी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List