पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीय भाजप नेत्याला 40 वर्षांची शिक्षा, 5 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप
हरियाणातील एका व्यक्तीला ऑस्ट्रेलियामध्ये बलात्काराच्या आरोपाखाली 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बालेश धनखड, असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पाच कोरियन महिलांवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात सिडनीच्या न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली आहे. धनखड हा ऑस्ट्रेलियातील भारतीय जनता पक्षाच्या ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजप’ या सहाय्यक संघटनेचा अध्यक्ष राहिला आहे. बालेश धनखड हा पंतप्रधान मोदी यांचा निकटवर्तीय असल्याचंही बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालेश 2006 मध्ये शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. येथे शिक्षणानंतर त्याने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये डेटा व्हिज्युअलायझेशन सल्लागार म्हणून काम केले. याचदरम्यान त्याने कोरियन वंशाच्या 5 महिलांवर बलात्कार केला. बालेश धनखड याला 2018 मध्ये तेथील पोलिसांनी अटक केली होती.
नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार
धनखडवर 2017 मध्ये पाच कोरियन महिलांना नोकरीचे आमिष दाखवून आणि नंतर त्यांना अंमली पदार्थ देत बलात्कार केल्याचा आरोप होता. ऑक्टोबर 2018 मध्ये पोलिसांनी धनखड यांच्या अपार्टमेंटवर छापा टाकला होता. यावेळी त्यांना छुपे कॅमेऱ्यांनी बनवलेले डझनभर सेक्स व्हिडीओ सापडले. आता त्याला ऑस्ट्रेलियात 5 महिलांवर बलात्काराच्या प्रकरणांसाठी 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, बालेश धनखड हा ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपचा ऑस्ट्रेलियन अध्यक्ष राहिला आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात बालेश धनखड खूप सक्रिय दिसला होता. बालेश याने त्यावेळीचे अनेक फोटो त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केले होते. याशिवाय बालेश मे 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी हिंदुस्तानातही आला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List