मराठवाड्यातील 10 साखर कारखान्यांची घरघर थांबली; 78 लाख मे. टन उसाचे गाळप, 62 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील 10 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला असून, विभागात आतापर्यंत 22 साखर कारखान्यांनी 78 लाख 78 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून 62 लाख 33 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 7.91 टक्के प्राप्त झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील साखर कारखान्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरनंतर ऊस गाळपास सुरुवात केली. 22 साखर कारखान्यांनी ऊस गळीत हंगामात सहभाग नोंदविला आहे. यामध्ये सहकारी तत्त्वावर चालणारे 13 आणि खासगी 9 साखर कारखान्यांचा समावेश आहे. हे सर्व साखर कारखाने पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करीत आहेत. विभागातील साखर कारखान्यांनी बुधवार 5 मार्चपर्यंत 78 लाख 78 हजार 280 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, 62 लाख 33 हजार 33 हजार 545 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
दहा कारखान्यांचे ऊस गाळप थांबले
प्रादेशिक विभागातील 22 पैकी 10 साखर कारखान्यांनी उसाचे गाळप थांबवले आहे. यामध्ये 6 सहकारी आणि 2 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. गाळप थांबवलेल्या साखर कारखान्यांत नंदुरबार जिल्हयातील श्री सातपुडा तापी परिसर कारखाना (152597मे. टन), आयान मल्टीट्रेड एलएलपी समशेरपूर (635523मे.टन), जळगाव जिल्ह्यातील बारामती अॅग्रो (104329), छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जयहिंद शुगर (गंगापूर सहकारी साखर कारखाना) जामगाव (91289 मे.टन), छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग हुसनपूर (264144 मे.टन), गेवराई तालुक्यातील जयभवानी साखर कारखाना (441541 मे.टन), सुंदररावजी सोळंके माजलगाव साखर कारखाना तळेगाव (421128 मे.टन), गंगा माऊली शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज अशोकनगर (341650 मे. टन), छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव (253206 मे. टन) आणि येडेश्वरी अॅग्रो प्रॉडक्टस् आनंदगाव ता. केज या कारखान्याने 683617 मे. टन ऊसाचे गाळप करून गाळप हंगाम आटोपता घेतला आहे.
12 कारखान्यांत गाळप सुरू
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात 10 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेतला असला तरीही आणखी 12 साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. यामध्ये पैठणचा सचिन घायाळ शुगर, श्री रेणुकादेवी शरद साखर कारखाना विहामांडवा, बारामती अॅग्रो कन्नड, मुक्तेश्वर शुगर मिल्स शेंदुरवादा-धामोरी, पंचगंगा शुगर अँड पावर प्रा.लि. महालगाव, जालना जिल्हयातील अंकुशनगर (ता. अंबड) आणि तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ हे दोन साखर कारखाने, समृध्दी शुगर रेणुकानगर, श्रध्दा एनर्जी अँड इन्फ्रा प्रोडक्टस वरफळ, बीड जिल्हयातील श्री गजानन साखर कारखाना राजुरी, वैद्यनाथ साखर कारखाना परळी वैजनाथ हे साखर कारखाने ऊसाचे गाळप करीत आहेत. गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यात आणखी 3 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List