रोखठोक – मराठीचा अपमान, औरंगजेबाचा गौरव; खरे गुन्हेगार कोण?

रोखठोक – मराठीचा अपमान, औरंगजेबाचा गौरव; खरे गुन्हेगार कोण?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी हे मुंबईत येऊन जोरात म्हणाले, “मुंबईची भाषा मराठी नाही.” यावर राज्य सरकार थातूरमातूर उत्तरे देऊन गप्प बसले. मराठीचा अपमान आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आपल्याच घरातले आहेत. अबू आझमींवर कारवाई झाली, पण भाजप परिवारातील या गुन्हेगारांना कोण वाचवत आहे?

मराठी भाषा आणि मराठी माणसाचे खरे शत्रू आपल्या घरातच आहेत त्याचे प्रत्यंतर रोजच येत आहे. गेल्या 40-45 वर्षांच्या राजकीय, सामाजिक आणि वृत्तपत्रीय जीवनात अनेक लढाया माझ्यासारखे कित्येक जण लढले. त्यात मराठी भाषेची लढाई ही कधीच संपणार नाही. कारण मराठीवर घाव घालणारे घरातच आहेत. जगाच्या इतिहासात अशी कोणतीही लढाई नसेल की, ज्या लढाईत शत्रूच्या हल्ल्यामुळे नव्हे तर ज्यासाठी आपण लढतो, त्या जनतेच्या दुराग्रहामुळे सैन्याला पीछेहाट पत्करावी लागली असेल. भारतीय जनता पक्षाचे व खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते भैयाजी जोशी यांनी महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई शहरात येऊन एक धक्कादायक विधान केले. त्यांनी सांगितले, “मुंबईची भाषा मराठी नाही. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच पाहिजे असे नाही.” श्री. जोशी यांनी पुढे जाऊन असे जाहीर केले की, “मुंबईतील घाटकोपरसारख्या भागाची भाषा ही गुजरातीच आहे.” मुंबईत येऊन केलेल्या या विधानाने महाराष्ट्राचे मन दुखावले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजीराजांची ही मराठी भाषा. याच भाषेतून महाराष्ट्र निर्मिती झाली. त्या महाराष्ट्रासाठी ज्या 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्या हुतात्म्यांची भाषा ही मराठी, पण भैयाजी जोशींसारखे ज्येष्ठ नेते “मराठी कशाला?” हा प्रश्न मुंबईत येऊन विचारतात व महाराष्ट्र थंड राहतो. सरकार पक्षाचे लोक जोशी यांच्या विधानाचे समर्थन करतात. मराठीसाठी लढा देणारे मुंबईत अनेक जण. एखाद्या सामान्य अमराठी दुकानदाराने मराठी भाषेचा अपमान केला तर हे मराठीवादी त्या दुकानदाराच्या कानाखाली आवाज काढतात व त्याचा गाजावाजा करून प्रसिद्धी मिळवतात, पण भैयाजींसारखा संघाचा ज्येष्ठ नेता मराठीबाबत गंभीर विधान करतो तेव्हा हे सर्व पक्ष आणि कार्यकर्ते शांत बसतात.

छत्रपतींचा मराठी अभिमान

राजकारणासाठी नेत्यांना छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी हवे असतात. त्यांना औरंगजेबही लागतो, पण छत्रपतींची मराठीबाबतची भूमिका त्यांना मान्य नाही. हिंदवी स्वराज्य झाल्यावर भाषेचा प्रश्न आला. स्वराज्याची भाषा कोणती? फारसी की मराठी? छत्रपतींनी त्यासाठी अभ्यास समिती नेमली नाही. छत्रपतींनी सांगितले, “महाराष्ट्राची भाषा मराठी.” असे सांगून छत्रपतींनी मराठी ही राजभाषा केली. राज्याभिषेक करून छत्रपतींनी पहिले काम करून घेतले ते म्हणजे ताबडतोब ‘मराठी राजभाषा कोश’ तयार करून परकीय भाषेची महाराष्ट्रातून हकालपट्टी केली. हा इतिहास ज्यांना माहीत नाही त्यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवू नये. मात्र मुंबईची भाषा मराठी नाही, असे उघडपणे बोलणाऱ्यांना सरकारचे संरक्षण आज मिळते. मराठी ही मुंबईची भाषा नाही असे बोलणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारनेही राजद्रोहाचे गुन्हे दाखल करायला हवेत, पण महाराष्ट्रात कोण कोणत्या जातीचा व धर्माचा माणूस विधान करतोय त्यावर कारवाया होतात. भैयाजी जोशी यांनी मुंबईत येऊन केलेले विधान लखनऊवरून आलेल्या समाजवादी पार्टीच्या नेत्याने किंवा अबू आझमींनी केले असते तर देवेंद्र फडणवीस व त्यांच्या आमदारांनी सभागृहात दंगल केली असती आणि या सगळ्यांवर राजद्रोहाचे खटले दाखल करायला लावले असते, पण भैयाजी जोशी हे भाजपचे नेते आहेत. त्यांचा साधा निषेधही कोणी केला नाही व मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरावर सगळेच खूश. “मुंबईची भाषा मराठीच आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले, पण त्या भाषेवर हल्ले करणाऱ्यांना ते अभय देत आहेत.

अबू आझमींवर कारवाई, इतर मोकाट

महाराष्ट्रात मराठी भाषा, इतिहास आणि स्वाभिमानाच्या बाबतीत फडणवीस यांचे सरकार कशी दुटप्पी भूमिका घेत आहे ते पाहणे गरजेचे आहे. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी विधान भवनाच्या परिसरात औरंगजेबाविषयी गौरवोद्गार काढले. त्यामुळे शिवराय आणि संभाजीराजांचा अपमान झाला. सरकारने अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन केले. आता त्यांना अटक करण्याची मागणी सगळेच करीत आहेत, पण भाजपशी संबंधित ‘महान’ लोकांनी याच काळात दिवसाढवळ्या शिवरायांचा अपमान केला. ते सर्व लोक मोकाट आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आतापर्यंतचा सगळ्यात घाणेरडा आरोप केला. शिवाजी महाराज हे भ्रष्टाचारी असल्याचेच राहुल सोलापूरकर यांनी म्हटले. “महाराज औरंगजेबाच्या कैदेतून ‘आग्रा’ येथून सटकले ते शौर्य वगैरे अजिबात नव्हते. महाराजांनी पहारेकऱ्यांना व औरंगजेबाच्या लोकांना लाच दिली व सुटले,” असे विधान करून सोलापूरकर यांनी आग्य्राच्या सुटकेचा इतिहासच बदलला. यावर सोलापूरकरांवर काय कारवाई झाली? हेसुद्धा औरंगजेबाचे उदात्तीकरणच म्हणायला हवे, पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या बैठकीतले असल्याने औरंगजेबाला महान करून सोलापूरकर सुटले व ‘धर्म’ आड आल्याने अबू आझमी त्याच गुन्ह्यासाठी ‘फासावर’ गेले! छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनपटावरील ‘छावा’ चित्रपट सध्या सुरू आहे. संभाजीराजे संगमेश्वरात मुक्कामास असताना औरंगजेबाला त्याबाबत ‘खबर’ मिळाली व मोगलांनी संभाजीराजांना अटक केली आणि यातना देऊन मारले. या बलिदानामुळे महाराष्ट्र आजही हळहळत आहे. संभाजीराजांची ‘खबर’ नक्की कोणी दिली? गणोजी शिर्के की महाराजांच्या दप्तरात काम करणाऱ्या ब्राह्मण सरकारकुनाने? डचांच्या इतिहासात संभाजींना पकडून देणारा महाराजांच्या दप्तरात सेवा बजावणारा हाच सरकारकून असल्याचे नोंदविले आहे. तरुण इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी याबाबतचे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा नागपूरचा कार्यकर्ता प्रशांत कोरटकर भडकला व त्याने इंद्रजित सावंत यांना धमक्या देणारे फोन केले. कोरटकर त्याच्या धमकीत सावंत यांना म्हणतो, “जिथे असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू. तुम्ही कितीही मराठे एकत्र करा. बघून घेईन.” याच संभाषणात कोरटकराने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले. त्याच्या शिवराळपणातून माँसाहेब जिजाऊ सुटल्या नाहीत. हा आवाज व या धमक्या शिवरायांना शिवराळ भाषा वापरणाऱ्या कोरटकरच्याच असल्याचे उघड होऊनही हा कोरटकर मोकाट आहे. कोरटकरच्या जागी एखादा ‘खान’ असता तर फडणवीसांच्या सरकारने इतिहासाच्या नावाने हल्लाबोल केला असता. फडणवीस विधानसभेत म्हणाले, “कोरटकर हा चिल्लर माणूस आहे.” त्या चिल्लर माणसाचे फडणवीसांपासून मोहन भागवतांपर्यंत सगळ्यांशी संबंध आहेत. त्याची भाजप वर्तुळात उठबस असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. हा चिल्लर भाजप आणि संघ परिवाराचा असल्याने धमक्या देऊन शिवरायांचा अपमान करूनही मोकाट कसा? कोरटकर, सोलापूरकर यांच्यावर कारवाई न करणे म्हणजे भाजपपुरस्कृत औरंगजेबाचे उदात्तीकरणच आहे.

मिंधे पूर्ण थंड

शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांच्या मराठी भाषेचा अपमान होतो व औरंगजेबाचा गौरव होतो. भाषेचा अपमान आणि औरंगजेबाचा गौरव करणाऱ्यांवर मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करत नाहीत. हे चित्र चांगले नाही. अजित पवार यांच्याकडून काहीच अपेक्षा करता येत नाहीत, पण “आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत,” असे सांगणारे एकनाथ शिंदे व त्यांचे लोकही औरंगजेबाचा गौरव होताना आणि मराठीवर हल्ले सुरू असताना षंढासारखे शांत राहिले. अबू आझमींवर कारवाई करा असे सांगणारे शिंदे हे भैयाजी जोशी, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरने केलेल्या त्याच गुन्ह्यावर गप्प बसले.

महाराष्ट्रात ढोंग वाढते आहे.

मराठीचा अपमान, औरंगजेबाचा गौरव त्या ढोंगाचीच निर्मिती आहे.

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

व्यापाऱ्यांकडून ‘गुंडा टॅक्स’ची वसुली, व्हिडिओ कॉलवर मुलांच्या हत्येची धमकी, मुंबई पोलिसांनी त्याला असे पकडले? व्यापाऱ्यांकडून ‘गुंडा टॅक्स’ची वसुली, व्हिडिओ कॉलवर मुलांच्या हत्येची धमकी, मुंबई पोलिसांनी त्याला असे पकडले?
Mumbai Crime News: महाराष्ट्रातील व्यापाऱ्याकडून ‘गुंडा टॅक्स’ची वसुली करणारा आरोपी अनेक दिवसांपासून फरार होतो. तो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करुन पिस्तूल...
‘राज्य मी आणणार, त्यांना सोडणार नाही, विरोधकांची दांडी उडवणार…’, उद्धव ठाकरे यांचा कोणा कोणावर हल्ला?
‘राज ठाकरेंना ‘ती’ गोष्ट समजत नाही..’, गंगेबद्दलच्या वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्ते संतापले
भाजप हिंदुत्ववादी, देशप्रेमी आहे हेच फेक नरेटीव्ह; निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे जबरदस्त फटकारे
गणपत गायकवाडांचे नाव घेऊ नको, अन्यथा तुझे बाबा सिद्दीकी करू…शिवसेना नेते महेश गायकवाड यांना धमकी
आम्हाला वाटलं हा डिप्रेशनमध्ये आहे; घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलसोबत दिसणारी ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?
बर्थडेला केकसाठी पैसे नव्हते म्हणून रसमलई कापून…; परिणितीची संघर्ष कथा ऐकून नेटकरी हैराण