तलासरीच्या स्टेट बँकेत कर्ज घोटाळा; बचत गटांच्या नावे पैसे हडपले, बँक कर्मचाऱ्याचा कारनामा उघड
महिलांना व्यवसाय करताना आर्थिक मदत व्हावी, त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी तयार करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या नावावर परस्पर कर्ज काढून लाखो रुपये हडप केल्याचा प्रकार तलासरीत घडला आहे. तालुक्यात सुमारे 65 महिला बचत गट आहेत. त्यापैकी सहा बचत गटांच्या नावावर परस्पर कर्ज काढण्याचा कारनामा स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांनी केला आहे. व्याजाचे आणि कर्ज परतफेडीचे हप्ते बँक खात्यातून जाऊ लागल्यानंतर तब्बल एक वर्षान हा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी तलासरी पोलिसांकडे केली आहे.
तलासरी तालुक्यातील हिमालय महिला स्वयंसेवक बचत गटाच्या नावे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बोगस कागदपत्रांद्वारे तलासरी स्टेट बँकेतून पाच लाखांचे परस्पर कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिमालय महिला बचत गटाच्या नावावर 31 ऑगस्ट 2023 रोजी पाच लाख रुपये कर्ज काढण्यात आले. या कर्जाची बचत गटातील कोणत्याही सदस्याला माहिती नव्हती. त्यानंतर त्याच दिवशी 31 ऑगस्ट 2023 रोजी बचत गटाच्या खात्यातून ही रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली.
तब्बल एक वर्षानंतर 5 नोव्हेंबर 2024 रोजी महिला बचत गटाच्या खात्यामधून 76 हजार रुपये कर्जवसुली म्हणून कापून घेतले आणि हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पुन्हा पाच हजार रुपये कर्जवसुली करण्यात आली आहे. कोणतेही कर्ज न घेता आतापर्यंत असे एकूण 81 हजार रुपये खात्यातून गेल्यामुळे सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
घडलेल्या प्रकाराबाबत बचत गटाच्या अध्यक्षा आणि सदस्यांनी बँकेत चौकशी केल्यानंतर त्यांना बँकेच्या व्यवस्थापनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच लेखी तक्रार अर्जही घेण्यास नकार दिला.
कर्ज व्यवहारात कागदपत्र किंवा गटाच्या कोणत्याही सदस्याच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या नाहीत. त्यामुळे हे बोगस कर्ज प्रकरण असून यात बँकेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. न घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेकडून नोटिसा देऊन तगादा लावला जात आहे.
महिला बचत गटाचे कागदपत्रे स्वाक्षरी न घेता हे कर्ज स्टेट बँकेचे तत्कालीन मॅनेजर अमित कुमार आणि कर्ज विभागातील कर्मचारी राहुल धनावडे यांनी कसे मंजूर केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या कर्जासाठी बचत गटांनी कोणताही ठराव मंजूर केला नव्हता
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List