सिनेविश्व – अमहाराष्ट्रीय कलाकार आणि मराठी बोल
>> दिलीप ठाकूर
अनपेक्षित घडलेली गोष्ट, फारच सुखावह ठरते. ‘छावा’ चित्रपटासाठी साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीला आवर्जून गेलेल्या विकी कौशल व रश्मिका मंदाना यांना पत्रकारांचा गराडा पडणे स्वाभाविक होतेच. अशातच मराठीत आलेल्या एखाद्या प्रश्नाला विकी कौशलने मराठीत उत्तर देण्याचे आश्चर्य वाटले नाही. कारण तो मालाडच्या चाळीत लहानाचा मोठा होताना त्याने मराठी भाषा, मराठी संस्कृती यांचा अनुभव व आनंद घेतला आहे. मराठीतून मुलाखती दिल्या आहेत. रश्मिकाला शिर्डी कसे वाटले असे मराठीत विचारताच रश्मिकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले. त्यावेळी विकी कौशल तिच्या मदतीला आला आणि त्याने कानात सांगितलेले तिच्या ओठांवर मराठीतून आले. खूप छान वाटले… तिचे हे एवढेसे मराठी बोलणेही भरपूर लाईक्स, सकारात्मक कॉमेन्टस् मिळवणारे ठरले. ती चक्क बातमी झाली. एक परभाषिक कलाकार मराठीत बोलण्यातील तो आनंद होता.
‘घरत गणपती’ या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत एकीकडे अजिंक्य देव व अश्विनी भावे ही जोडी तर दुसरीकडे भूषण प्रधान व निकिता दत्ता जोडी. निकिता अमहाराष्ट्रीय. पटकथेनुसार ती या चित्रपटात फिट्ट बसली. दोघे जोडीने मुलाखत देता देता भूषण तिला मराठीत कुठे काय बोलायचे याचे सल्ले देई. सगळेच कॅमेऱयासमोर चाले. पण ते करता करता यावर खोचक प्रश्नदेखील कुठे कुठे विचारले गेले (त्याचीच तर बातमी होणार होती). तेव्हाचे त्याचे कसेसेच होणे छान वाटले.
अमहाराष्ट्रीय कलाकाराचे मराठी बोलणे कायमच कौतुकाचे. ‘कहानी किस्मत की’ या चित्रपटात रेखाची छेडछाड करीत धर्मेंद्रने दक्षिण मुंबईतील रस्त्यावर धमाल उडवलेल्या ‘रफ्ता रफ्ता देखो…’ या गाण्यात शेवटी दोघेही महाराष्ट्रीय वेषात शेतामध्ये ‘ये जवळ ये लाजू नको’ असा दिलेला तडका भारीच लोकप्रिय झाला. ‘आनंद’ चित्रपटात आनंदसमोरच (राजेश खन्ना) डॉ. प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) व त्यांच्या पत्नी (सीमाताई) मराठीत भांडू लागताच आनंद म्हणतो, ‘आता बोला ना?’ राजेश खन्ना पडद्यावर मराठीत बोलला म्हणून मराठीप्रेमी प्रचंड सुखावले. राजेश खन्ना मूळचा गिरगावकर. ठाकूरद्वार नाक्यावरील सरस्वती निवासचा रहिवासी. त्यामुळे त्याला मराठी बोलता यायलाच हवे. ‘सुंदरा सातारकर’ या मराठी चित्रपटात त्याने पाहुणा कलाकार म्हणून भूमिकाही केली आहे. त्याच्या खार येथील प्रशस्त कार्यालयातही मराठी वृत्तपत्रे येत आणि त्याची मुलाखतीसाठी वाट बघताना ती वाचूनही होत. गिरगावातच वाढलेला जितेंद्र आणि अखेरपर्यंत गिरगावातील खेतवाडीतील प्रताप निवास येथे राहिलेले दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचेही मराठी उत्तम. आमिर खानने मराठी शिकायचे ठरवले तेव्हा तो गिरगावातील पिंपळवाडीत लिमये सरांच्या घरी गेल्याची मोठी बातमी झाली होती.
राजकमल कलामंदिर (युवा विभाग) निर्मित ‘अशी ही बनवाबनवी’ या सर्वकालीन लोकप्रिय चित्रपटाच्या जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील सुवर्ण महोत्सवी सुपरहिट सोहळ्यास चित्रपती व्ही. शांताराम आणि दिलीपकुमार यांच्या शुभ हस्ते चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञांना ट्रॉफीज दिल्या तेव्हा दिलीपकुमारने भाषणाची सुरुवात मराठीतच केली आणि मग हिंदीत बोलणे सुरू केले. टाळ्या अर्थातच मराठीला पडल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत भटकंती करणाऱया महाराष्ट्रीय सिनेपत्रकार व फोटोग्राफरशी डिंपल कापडिया उत्तम मराठीत बोले. कालांतराने अक्षयकुमार, सुनील शेट्टी, सलमान खान हेदेखील समोरची व्यक्ती मराठी असल्याचे लक्षात येताच मराठीतून बोलत.
अशा हिंदी कलाकारांच्या मराठीशी नातेसंबंधाच्या गोष्टी अनेक. अमिताभ बच्चनने मराठीत भाषण केले आणि त्याचे थेट प्रक्षेपण दूरपर्यंत गेले. व्ही. शांताराम फाऊंडेशनच्या ‘शतक महोत्सवी मराठी चित्रपट संपदा’ या सूचीचे प्रकाशन दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होताना अमिताभने अतिशय धीरगंभीर आवाजात मराठीत भाषण केले.
मराठी रसिक मनाला अतिशय सुखावणाऱया अशा हिंदीतील कलाकारांच्या लहान-मोठ्या मराठी बाण्याच्या अनेक गोष्टी आहेत. ही केवळ एक बहुरंगी झलक.
(ाsखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List