Jalna News – जालन्यात खवले मांजराची तस्करी, सहा आरोपी वन विभागाच्या ताब्यात
जालनामध्ये खवले मांजराची तस्करी करणाऱ्या तब्बल सहा आरोपींना जालना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वन्यक्षेत्रातून खवले मांजराची तस्करी करून गुजरातमध्ये विक्री करण्याचा आरोपींचा प्लॅन होता. परंतु वन विभागाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून संबंधित तस्करांना तीन वाहनांसह ताब्यात घेतलं. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः ग्राहक बनून खबऱ्यांशी बोलणी केली. जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
खवले मांजर हा अतिशय दुर्मिळ प्राणी असून याची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. या प्राण्यांना वन्यजीव अधिवासातून पकडून तस्कर देश-विदेशात मोठ्या रकमेला या प्राण्याची विक्री करतात. मंठा शहरातून हे आरोपी जालनाकडे येत असताना वनविभागाचे अधिकारी नागरगोजे व दौंड यांनी शिताफीने सापळा रचून तब्बल सहा आरोपींना तीन वाहनांसह ताब्यात घेतले. या आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया वन विभागाकडून करण्यात येत आहे. दरम्यान या टोळीचा आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असण्याची शक्यता असल्याचे वन्यजीव संरक्षक अधिकारी सुदाम मुंडे यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List