विशेष – तिचं खुलं आकाश…
>> लता गुठे
भारतीय समाजात कुटुंब ही मूलभूत संस्था मानली जाते. स्त्री ही या संस्थेचा महत्त्वाचा खांब आहे. कारण घराला सर्व दृष्टीने ती सक्षम करते. घराला घरपण देण्याचं काम ती करते. निष्काम कर्मयोगी बनून. कोणत्याही वादळात धैर्याने उभी राहते. तिच्याकडून प्रत्येकाच्या अपेक्षा असतात, त्या ती पूर्ण करते. स्वतचा विचार न करता एक पत्नी, आई, सून व सर्व नाते सांभाळते, मुलांवर संस्कार करते, पण घराच्या पाटीवर मात्र नवऱ्याचे नाव असते. कालांतराने तिच्या भूमिकेत बदल झाले असले तरी तिचे कुटुंबातील स्थान आजही अतिशय महत्त्वाचे आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत
ती वातीसारखी तेवत असते
प्रत्येक घरासाठी बाई
चालती बोलती गीता असते
काळ कोणताही असो, अगदी आदिमानवापासून ते आजच्या कुटुंबव्यवस्थेपर्यंतचा जर विचार केला तर आपल्या असे लक्षात येते की, स्त्रियांचे कुटुंबातील स्थान हे आधारस्तंभ आणि संस्कार या गोष्टींमुळे अधोरेखित झाले आहे. स्री ही अशिक्षित असो किंवा सुशिक्षित, मुळातच ती सृजनशील आणि सर्जनशील असल्यामुळे तिच्याकडे नवनिर्मिती क्षमता विलक्षण आहे. म्हणूनच शेतीचा शोध स्त्रियांनी लावला हे उदाहरण पुरेसे आहे.
प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना ही गोष्ट जाणवते की, स्त्रीला `गृहलक्ष्मी` मानलं जात होतं. ती केवळ घर सांभाळणारी नव्हे, तर कुटुंबाच्या संस्कारांची वाहक होती. धार्मिक विधींमध्ये तिचा सािढय सहभाग असे. परंतु काही काळानंतर सामाजिक बंधने वाढली आणि स्त्रीला घराच्या चौकटीत बांधले गेले.
स्री ही पुरुषापेक्षा अनेक बाबतीत सक्षम आहे हे तेव्हा पुरुषांच्या लक्षात आले, त्यांनी स्त्रीला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. पहिली गोष्ट ही केली की, आर्थिकदृष्टय़ा तिला कमजोर केले. कुटुंबासाठी त्याने कमवून आणायचे आणि तिने घर सांभाळायचे हा अलिखित नियमच तयार करून घेतला. तो कमवता म्हणून त्यांची सत्ता, अधिकार जास्त. तो बाहेर पडला, त्याने जग पाहिले म्हणून तो शहाणा. आणि ती घरात म्हणून ती बावळट ठरवून कायम गृहीत धरून रांधा, वाढा आणि उष्टी काढा एवढाच तिने विचार करायचा. ही परिस्थिती आजपर्यंत. थोडय़ाफार प्रमाणात काही गोष्टी बदलल्या तरीही तिच्या कामांमध्ये बदल झाला नाही. इंग्रजी राजवटीत शिक्षणाची दारं सर्वांसाठीच खुली झाली. पुरुषांप्रमाणे थोडय़ाफार प्रमाणात स्त्रियाही इंग्रजी शाळेत जाऊ लागल्या. इंग्रजी साहित्य वाचनातून व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार साहित्यातून अधोरेखित होऊ लागला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रानडे यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडी केली, बालविवाह, विधवा विवाह, सतीची चाल अशा अनिष्ट रूढींविरुद्ध कायदे करून प्रतिबंध घातला. मुली शिकू लागल्या, शिक्षणामुळे त्यांना त्यांचे अधिकार हक्क समजू लागले. तरीही कुटुंबामध्ये मात्र दुय्यम स्थान दिले गेले.
भारतीय समाजात कुटुंब ही मूलभूत संस्था मानली जाते. स्त्री ही या संस्थेचा महत्त्वाचा खांब आहे. कारण घराला सर्व दृष्टीने ती सक्षम करते. घराला घरपण देण्याचं काम ती करते. निष्काम कर्मयोगी बनून. कोणत्याही वादळात धैर्याने उभी राहते. तिच्याकडून प्रत्येकाच्या अपेक्षा असतात, त्या ती पूर्ण करते. स्वतचा विचार न करता एक पत्नी, आई, सून व सर्व नाते सांभाळते, मुलांवर संस्कार करते, पण घराच्या पाटीवर मात्र नवऱ्याचे नाव असते. कालांतराने तिच्या भूमिकेत बदल झाले असले तरी तिचे कुटुंबातील स्थान आजही अतिशय महत्त्वाचे आहे.
आज नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्त्री घराबाहेर पडली. तिचे कामाचे तास वाढले. घर आणि नोकरी सांभाळताना तिची तारेवरची कसरत होते. बाहेरच्या जगात यशस्वीरीत्या तिने आपली योग्यता सिद्ध केली तरी कुटुंबाची देखभाल, मुलांचे शिक्षण, वृद्धांची काळजी, आर्थिक निर्णय, आणि सामाजिक संबंध यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर ताण पडतो हे इतरांच्या लक्षात येत नाही किंवा घरातील माणसं तिच्या कर्तृत्वाची दखलही घेत नाहीत. सर्वांचं करणं हे घरातील स्रीचं कर्तव्यच आहे, वरून असंही बोलून दाखवलं जातं.
ही झाली शहरी भागातील स्त्रियांची स्थिती. ग्रामीण भागातील स्त्रियांची स्थिती आणखी खूप गंभीर आहे. सकाळी पाच वाजता त्यांचा दिवस सुरू होतो, तर रात्री दहा वाजता संपतो. घरातील सर्व कामे करून दिवसभर शेतात काम करायचं आणि परत संध्याकाळी घरातील स्वयंपाक व इतर कामे करायची. तिला ना कुठले अधिकार ना हक्क. शेतीच्या उत्पादनातून जो मोबदला येतो त्यामध्ये तिचा मात्र वाटा नसतो.
स्रीविषयक थोर तत्त्ववेत्ते, महान भारतीय तत्त्वज्ञ योगी अरविंद घोष यांचे स्त्रीविषयक विचार मला फार महत्त्वाचे वाटतात. ते प्रगत, आदर्शवादी आणि स्त्रीच्या आत्मविकासावर भर देणारे होते. त्यांनी स्त्रीला केवळ घरगुती भूमिका निभावणारी व्यक्ती न मानता, समाजाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी महत्त्वाचा घटक मानले. आई म्हणून स्त्री ही मुलांची पहिली शिक्षिका असते. तिच्या संस्कारांवरच पुढच्या पिढीचा पाया रचला जातो. अरविंद घोषांनी स्त्रियांना केवळ कुटुंबाच्या चौकटीत न पाहता, त्यांना एक स्वतंत्र, सामर्थ्यशाली आणि आध्यात्मिक व्यक्ती मानले. त्यांचे विचार आजही स्त्री सबलीकरणासाठी प्रेरणादायी ठरतात.
स्त्रीचे कुटुंबातील महत्त्व कायम असले तरी तिला अनेकदा दुर्लक्षित केले जाते. घरगुती निर्णयप्रािढयेत दुय्यम स्थान आणि तिच्या कष्टांची योग्य दखल न घेणे हे अजूनही कटू वास्तव आहे. मात्र, शिक्षण, स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरणामुळे काही प्रमाणात दृष्टिकोन बदलत आहे.
भारतीय कौटुंबिक स्री कायमच संस्कृती, परंपरा याचा आदर करून ती टिकवण्याचा प्रयत्न करते. आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये तिने वेगळा ठसा उमटवला आहे. ती तिचे कर्तव्य कधीच नाकारत नाही. किंवा कुठल्याही वादळाला न घाबरता तोंड देते. ते पेलवण्याचे सामर्थ्य निसर्गानेच तिला दिले आहे. कायम तिचे कर्तव्य ती प्रामाणिकपणे पार पडते, कोणत्याही अपेक्षांशिवाय. म्हणून स्त्रीचे कुटुंबातील स्थान हे केवळ परंपरेपुरते मर्यादित नाही, तर ती कुटुंबाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची खरी आधारस्तंभ आहे.
प्रत्येक कुटुंबाची ही जबाबदारी आहे की, घरातील स्त्रीचा सन्मान करून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला पाहिजे. तिच्या भावनेची कदर करून तिच्या कामाचे मोल केले पाहिजे. घरातील स्त्री ही सक्षम असेल तर सारे घर सक्षम राहील. घरातील स्त्रीची अडवणूक न करता तिच्या जबाबदाऱ्या जर इतरांनी वाटून घेतल्या तर तिला अधिक क्षमतेने कार्य करण्यात प्रेरणा मिळेल. आणि आपली कुटुंबपद्धती आणखी सक्षम बनेल. खरेतर स्री ही लक्ष्मी, दुर्गा आणि शक्तीचे रूप आहे. प्रत्येक स्रीने तिची क्षमता ओळखून तिच्यावर होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करायला पाहिजे. तिने स्वतची काळजी स्वत घ्यायला पाहिजे. जी स्री आर्थिकदृष्टय़ा सक्षम असेल किंवा ती गृहिणी असेल तरीही घरातील प्रत्येक निर्णय घेण्याचा अधिकार तिला असायला पाहिजे.
शेवटी जाता जाता समस्त स्त्रियांसाठी माझ्या कवितेतील चार ओळी समर्पित…
कर खुलं ते आकाश, थांबू नको आता कुठे
पंख लावून मनाला, जा गं तुला हवं तिथे
(लेखिका ज्येष्ठ साहित्यिका आहेत.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List