धारावीकरांचा आवाज आणखी बुलंद, राहुल गांधी यांनी गल्लीबोळात जाऊन छोट्या व्यावसायिकांशी साधला संवाद
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीला काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भेट दिली. धारावीतील गल्लीबोळात जाऊन चर्मोद्योग व्यावसायिकांसह इतर छोट्या उद्योजकांशी त्यांनी संवाद साधत त्यांनी धारावीतील उद्योजकता आणि प्रतिभावान तरुणांचा आवाज देशभरात पोहोचवणार सांगितले.
स्थानिकांचा विरोध असतानाही धारावीचा पुनर्विकास अदानीमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे धारावीला वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या येथील परंपरागत चालणाऱ्या उद्योगधंद्यांचे काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा धारावी दौरा महत्त्वपूर्ण ठरला. लघुउद्योगांचे केंद्र असलेल्या धारावीत जाऊन त्यांनी येथील चमार स्टुडिओचे सुधीर राजभर यांच्याशी संवाद साधला. रिसायकल टायरपासून बनवलेल्या उत्पादनांची पाहणी करताना तिथल्या कामगारांच्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले.
सुधीर राजभर यांनी धारावीच्या कारागीरांचे सुप्त कौशल्य ओळखून एक असा ब्रँड तयार केला, जो जागतिक स्तरावर फॅशनच्या सर्वात प्रतिष्ठत कॉरिडॉरमध्ये ओळखला जातो. पारंपरिक कारागिरी आणि आधुनिक उद्योजकतेचा संगम हेच त्यांचे यश आहे, अशी पोस्ट एक्सवर राहुल गांधी यांनी धारावी भेटीनंतर केली आहे.
धारावीतील चमार स्टुडिओला दिलेल्या भेटीचे फोटो राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राहुल गांधी मशीनवर शिवणकाम करताना तसेच बॅग विणत असल्याचे दिसत आहे.
धारावीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना, राहुल गांधी यांनी येथील उद्योजकता आणि प्रतिभावान तरुणांचा आवाज संपूर्ण देशापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी धारावीमध्ये संवाद साधला. धारावीच्या न्यायाच्या लढाईत ते आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List