Sangli crime news – अनैतिक संबंधातून सांगलीत सेंट्रिंग कामगाराचा खून, तिघे अल्पवयीन ताब्यात
सांगली शहरालगत असणाऱ्या कदमवाडी रस्त्यावर भरदुपारी सेंट्रिंग कामगारावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले असून, याप्रकरणी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भररस्त्यात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली. या हल्ल्यात दत्ता शरणाप्पा सुतार (वय – 30, रा. शिवशंभो चौक) असे खून झालेल्याचे नाव आहे. घटनेनंतर एका तासात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तिघांना अटक केली. घटनास्थळी कोयता, चाकू जप्त करण्यात आला. कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगली दौऱ्यावर आहेत. ते गुरुवारी सकाळी उपअधीक्षक कार्यालयात गाठीभेटी घेत होते. त्याचवेळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली.
मृत दत्ता सुतार हा सेंट्रिंग कामगार आहे. तो यापूर्वी इंदिरानगर परिसरात राहण्यास होता. गेल्या काही दिवसांपासून शिवशंभो चौकातील एका महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे सुतार हा त्या महिलेच्या घरीच राहण्यास होता. त्यांच्यासोबत त्या महिलेचा अल्पवयीन मुलगाही राहत होता. आज सकाळी मृत दत्ता आणि त्याचा मित्र अतुल ठोंबरे हे कामासाठी घरातून बाहेर पडले. दुपारी त्या महिलेच्या मुलाने मृत सुतार याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याला पैसे देण्यासाठी मृत सुतार व त्याचा मित्र ठोंबरे हे दोघे दुचाकीवरून सांगलीवाडीतून कदमवाडी रस्त्यावर गेला.
दरम्यान, त्याचवेळी संशयित मुलगा आणि त्याचे दोन साथीदार संबंधाचा राग पूर्वीपासूनच त्या मुलाच्या मनात होता. त्याच रागातून त्याने काटा काढण्याचा कट रचला. दत्ता दुचाकीवरून त्याठिकाणी आल्यानंतर क्षणात संशयित मुलाने छातीवर दगड मारला. त्यावेळी दत्ता रस्त्यावर पडला. त्यानंतर चिडलेल्या मुलाने हातातील कोयत्याने त्याच्यावर वार केले. वार इतके वर्मी होते की त्याच जागीच मृत्यू झाला.
पोलीस उपअधीक्षक विमला एम., शहरचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेनंतर अवघ्या एक तासाच्या आत संशयितांना गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे यांनी ही कारवाई केली.
आईला मारहाण अन् उफाळलेला राग
मयत दत्ता याचे संशयित मुलाच्या आईशी अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून तो त्या महिलेच्याच घरात राहण्यास होता. दत्ता त्या महिलेसोबत किरकोळ कारणातून वाद घालत मारहाणही करत होता. हे संशयित मुलगा नेहमी पाहायचा त्यातून त्याचा राग उफाळत गेला. दत्ताचा काटा काढण्याचा कट यापूर्वीही रचण्यात आला होता. मात्र, संशयिताने आज त्याला निर्जनस्थळी गाठत खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List