कर्णकर्कश डीजे, हेडफोनचा अतिरेक, गाड्यांचे हॉर्न; ठाण्यात दहापैकी तिघांचे कान ‘गेले’
कानाला हेडफोन लावून सतत गाणी ऐकणे, डीजेचा कर्णकर्कश आवाज, गाड्यांचे मोठमोठ्याने वाजणारे हॉर्न, मोबाईलचा अतिवापर यामुळे ठाणेकरांचे कान बधिर होत चालले आहेत, व्यवस्थित ऐकू येत नाही, अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढल्या असून दहापैकी तिघांचे कान अक्षरशः कामातून जात आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या दहा व्यक्तींपैकी दोन ते तीन जणांमध्ये बहिरेपणाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे ठाणेकरांनो.. सावध व्हा आणि आपला कान जपा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या ठाण्यात आवाजाचे प्रदूषण कमालीचे वाढले असून रेल्वे स्टेशन परिसर, तीन हात नाका, माजिवडा नाका, कळवा नाका, मुंब्रा स्टेशन परिसर अशा अनेक ठिकाणी भलामोठा आवाज येतो. त्यातच रिक्षा, बाईक, कार यांच्या हॉर्नची भर पडते. त्याशिवाय लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत कानाला हेडफोन लावत रात्री उशिरापर्यंत गाणी ऐकण्याची सवयदेखील वाढत चालली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हृदयविकाराचाही धोका
ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी हेडफोन कानात घालून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुण, तरुणींना ट्रेनने उडवल्याच्या घटना घडल्या आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जागतिक श्रवण दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार यांनी हेडफोन लावण्याची सवय थोडी कमी करा, असा सल्ला ठाणेकरांना दिला आहे. डॉ. धीरज महांगडे, डॉ. मृणाल राहुड, विश्वास वासनिक आदी तज्ज्ञ डॉक्टरांनीदेखील मार्गदर्शन केले. मोठ्या आवाजामुळे बहिरेपणा तर येतोच, पण हृदयविकाराचा झटकादेखील येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List