कल्याण – डोंबिवलीतील साडेसहा हजार रहिवाशी बेघर होणार, बेकायदा 51 इमारती तोडण्याचे न्यायालयाचे आदेश; महारेराची बोगस कागदपत्रे बनवणारे अधिकारी, बिल्डर मोकाट
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी, उपनिबंधक कार्यालयातील सडकी यंत्रणा आणि बोगस बिल्डरांच्या ‘महायुती’मुळे कल्याण, डोंबिवलीतील तब्बल साडेसहा हजार रहिवासी बेघर होऊन त्यांचे संसार रस्त्यावर येणार आहेत. महारेराची बोगस कागदपत्रे बनवून उभारलेल्या 51 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. गंभीर बाब म्हणजे या इमारतीला परवानगी देणारे अधिकारी आणि बिल्डर करोडो रुपये कमवून मोकाट फिरत आहेत. आपल्यावर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून लबाड बिल्डरांनी प्लंबर, इलेक्ट्रीशियन आणि लेबर कॉण्ट्रक्टरना कागदोपत्री बिल्डर दाखवून त्यांना बळीचा बकरा बनवले आहे. रक्ताचे पाणी करून मिळवलेली कमाई या घरात घातली. आता आमचे नुकसान कोण भरून देणार, आम्ही जायचे कुठे, असा टाहो या रहिवाशांनी फोडला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात काही बिल्डरांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे महारेराचे खोटे नोंदणी प्रमाणपत्र मिळवले. महारेरा प्रमाणपत्र असल्याने या इमारतीमध्ये सर्वसामान्य कल्याण, डोंबिवलीकरांनी रक्ताचे पाणी करून, पै पै जमा करून साठवलेल्या पैशांतून आणि मोठी कर्जे काढून घरे घेतली. दरम्यान कल्याणचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी कल्याण, डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांविरोधात तीन वर्षांपूर्वी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2024 रोजी उच्च न्यायालयाने बनावट कागदपत्रांच्या आधारे महारेराची नोंदणी मिळवून उभारलेल्या बेकायदा इमारती 19 फेब्रुवारीपर्यंत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगोलग महापालिकेने या इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा रहिवाशांना बजावल्या. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या साडेसहा हजार रहिवाशांच्या पायाखाली धरणीपंप झाला.
बनावट कागदपत्रे कशी तयार केली? कोणी केली?
51 इमारतींमध्ये सुमारे सहा ते साडेसहा हजार कुटुंबे राहत आहेत. 25 ते 30 लाखांत त्यांनी घरे खरेदी केली. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले. कुणाला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला. पण अचानक या इमारती बेकायदा असल्याचे सांगण्यात आले. आता मुलाबाळांना, म्हाताऱ्या आईबाबांना घेऊन कुठे जायचे, काय करायचे, त्यांना चिंतेने ग्रासले आहे. इतक्या वर्षांनी प्रशासनाला जाग का आली, बनावट कागदपत्रे तयार झालीच कशी, ती कोणी बनवली, रजिस्ट्रेशनसाठी कागदपत्रे देण्यात आली तेव्हा प्रशासनाने आणि उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ती तपासली नाही का, असे असंख्य प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. रेरा नोंदणीसह सर्व परवानग्या पाहूनच आम्ही घरे घेतली आहेत. ही केवळ आमचीच नव्हे तर सरकारचीही फसवणूक आहे. त्यामुळे सरकारने भूमाफिया, बिल्डर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करून रहिवाशांवरील अन्याय थांबवावा, अशी मागणी साई गॅलेक्सी इमारतीतील रहिवाशी प्रणव पाटील आणि रोहन गमरे यांनी केली.
या इमारतीतील रहिवासी आता घरे वाचवण्यासाठी कामधंदे सोडून वकिलांकडे आणि न्यायालयात धावत आहेत.
भविष्यात इमारतींवर कारवाई झाली तर त्यासाठी काढलेले लाखो रुपयांचे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत त्या आहेत. कर्ज फेडले नाही तर बँक अधिकारी त्यासाठी कोर्टात खेचण्याची भीती त्यांना भेडसावत आहे.
कर्जाचे हप्ते भरले नाही तर सीबिलचा रेकॉर्ड खराब होऊन भविष्यात पुन्हा कर्ज मिळणार नाही याची चिंताही त्यांना सतावत आहे.
घामाची कमाई बिल्डरांना देत घरे घेतली. पण आता ही घरे वाचवण्यासाठी न्यायालयात लढा लढण्यासाठी अनेकांनी दागिने मोडून, गावच्या जमिनी विकून धावाधाव सुरू केली आहे.
65 नव्हे 51 इमारतींवर हातोडा पडणार
65 इमारतींवर हातोडा पडणार असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत. परंतु 65 पैकी पाच इमारती पालिका क्षेत्राबाहेर आहेत. 60 मधील दोन इमारतींची दोनदा नोंद झाली आहे आणि सहा इमारती आधीच पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या 51 इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.
या इमारतींवर हातोडा पडणार
शांताराम आर्केड, गावदेवी गावदेवी हाईट्स सोसायटी, शिवाजीनगर तुलीप हाईट्स, शिवाजीनगर द्रौपदी हाईट्स, शिवाजीनगर एकविरा एन्टरप्रायझेस, आयरे गाव साईश इन्फ्रा, पाथर्ली बालाजी डेव्हलपर्स, नांदिवली तुकाराम पाटील, निळजे रतन चांगो म्हात्रे, नांदिवली सुनील बालाजी पाटील, आडिवली राजाराम भोजने, गोळवली विनायक वाटिका, सोनारपाडा श्री कॉम्पलेक्स, नांदिवली वाळकू हेरिटेज, आजदे शिवसाई रेसिडेन्सी, सोनारपाडा अर्णव कॉम्पलेक्स, नांदिवली दिनकर प्लाझा, आडिवली मंगलमूर्ती, माणगाव पंढरीनाथ गायकर, गोळवली इंद्रदास गायकर, गोळवली साईलिल रेसिडेन्सी, देसलेपाडा साई श्रध्दा, आडिवली गोकुळ कॉम्पलेक्स, निळजे विष्णु व्हॅली, माणगाव शिवसाई बालाजी, आजदे वारा हाईट्स, जुनी डोंबिवली लालचंद म्हात्रे, नवागाव शिवलिला, नवागाव मणिरत्न, शिवाजीनगर लक्ष्मण हाईट्स, कोपर सुदामा रेसिडेन्सी, ठाकुर्ली मयूर वरेकर, गावदेवी राजयोब, ठाकुर्ली संतुला आर्पेड, कोपर गाव समर्थ कॉमलेक्स, आयरे सनराईज, कांचनगाव साई गॅलेक्सी, आयरे जियाश्री प्राईड, कांचनगाव.
ना बिल्डरांना बेड्या, ना पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा
पालिका आणि उपनिबंधक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटी कागदपत्रे रंगवत बिल्डरांनी बोगस महारेरा प्रमाणपत्र मिळवले.
भविष्यात त्याचे भांडे फुटले तर आपण अडकू नये म्हणून घरे विकून करोडो रुपये कमवलेल्या या बिल्डरांनी बिल्डर म्हणून स्वतःची नावे नोंदवलीच नाहीत.
लेबर, कॉण्ट्रक्टर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांची नावे बिल्डर म्हणून दाखवली. त्याच 38 जणांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 21 जणांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस कागदपत्रांद्वारे खोटे महारेरा प्रमाणपत्र मिळवणारे आणि त्यातून घरे विकून करोडोंची माया कमवणारे बिलंदर बिल्डर मात्र मोकाट आहेत.
या इमारतींकडे आर्थिक फायद्यातून कानाडोळा करणारे प्रभाग अधिकारी, कागदपत्रांसाठी मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List