Santosh Deshmukh संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून लोकांमध्ये संतापाची लाट, बीड बंदचे केले आवाहन
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष यांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या घटनेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. संतोष देशमुख यांना कराड गँगने दिलेल्या मरणयातना पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी बीडमधील जनतेने आज मंगळवारी बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. दरम्यान कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांनी केले आहे.
अवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीला विरोध केला म्हणून कराड गँगने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले. संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालातही या अमानुष मारहाणीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मारहाण करताना संतोष देशमुख विव्हळतानाचे व्हिडीओ काढून ते दहशत निर्माण करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करण्यात आले. संतोष देशमुख यांच्या हत्येचा विकृत आनंद आरोपींनी घेतल्याचा उल्लेख एसआयटीने भरन्यायालयात केला होता. आज या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांना महेश केदार याच्या मोबाईलमध्ये मारहाणीचे 15 व्हिडीओ तसेच 8 फोटो सापडले. हे सर्व पुरावे म्हणून दोषारोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत.
संतोष देशमुख प्राणाची याचना करत असताना हे आरोपी त्यांच्या विव्हळण्याचा विकृत आनंद घेत होते. लोखंडी रॉडला करदोडे गुंडाळून त्याने मारहाण करण्यात आली. दोषारोपपत्रासोबत जोडण्यात आलेले व्हिडीओ, फोटोंनी संतोष देशमुखांच्या त्या शेवटच्या तीन तासांतील मरणयातनांचा प्रवास जगासमोर आणला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List