विरोधी पक्षनेत्यांचा सत्ताधाऱ्यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केली. याप्रकरणी विधानपरिषद सभागृहात आवाज उठवित असताना विरोधी पक्षनेत्यांचा सत्ताधाऱ्यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
राज्य सरकार विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अबू आझमी यांनी क्रूर बादशहा औरंगजेबचे उदात्तीकरण होईल, असे वक्तव्य केले. प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली आहे. राहुल सोलापूरकर यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा विकृतपणे इतिहास मांडला असल्याने या तिघांवर एकत्र कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली.
अबू आझमी यांचे विधानसभा सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले पाहिजे, अशा प्रकारे त्याने शिवाजी महाराजांच्या बाबत वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अबू आझमी यांच्या विरोधात भूमिका घेतली असली तरीही त्याचीच पिलावळ प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात काहीही भूमिका घेतली नसल्याची जोरदार टीका अंबादास दानवे यांनी केली.
राहुल सोलापूरकर याने आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विकृत पद्धतीने मांडला आहे. विकृत मानसिकता असलेल्या या गुन्हेगारावर कारवाई करण्याच्या ऐवजी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या सल्लागार समितीत घेऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे. सदरील प्रकरण लक्षात घेता शासनच राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असल्याचे दानवे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List