वाल्मीक कराडसारख्या प्रवृत्तीने जिणे हराम केले; भाजपच्या माजी नगरसेवकाचा पोलीस ठाण्यात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
वाल्मीक कराडसारख्या प्रवृत्तींच्या जाचाला कंटाळून सत्ताधारी भाजपचे नवी मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पोलीस ठाण्यात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात जागा खरेदी करून तिथे बांधकाम प्रकल्प सुरू केले आहेत. मात्र तिथे त्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत. याबाबतची तक्रार करण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात गेले असता तिथे त्यांनी विष प्यायले.
सीवूड येथे राहणारे भरत जाधव हे नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी दोन टर्म नवी मुंबई महापालिकेमध्ये सीवूड विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करून बांधकाम प्रकल्प सुरू केले आहेत. मात्र वाल्मीक कराडसारखी प्रवृत्ती असलेल्या काही गुंडांकडून त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या प्रकल्पांची अडवणूक केली जात आहे. याबाबतची तक्रार करण्यासाठी ते कर्जत पोलीस ठाण्यात गेले होते.
तक्रार देत असतानाच त्यांनी खिशातून विषाची बाटली काढली आणि तोंडाला लावली. हा प्रकार पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांना कर्जत शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी कारमध्ये बसून त्यांनी एक व्हिडीओ चित्रीत केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List