‘छावा’मध्ये कवी कलश साकारणारा अभिनेता कोण? अभिनयासाठी सोडला डॉक्टरचा पेशा
सध्या सर्वत्र लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाचीच जोरदार चर्चा आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवणाऱ्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘छावा’मधील मुख्य अभिनेता विकी कौशलच्या दमदार अभिनयकौशल्याचं तर कौतुक केलं जात आहे. पण त्याचसोबत छत्रपती संभाजी महाराजांचे कवी मित्र छंदोगामात्य (कवी कलश) यांच्या भूमिकेतील अभिनेता विनीत कुमार सिंहने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय. शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेल्या कवी कलश यांच्या भूमिकेतील विनीत हा गेल्या वीस वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करतोय. मात्र दुर्दैवाने तो आजपर्यंत बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होता. अखेर ती ओळख त्याला आता ‘छावा’ या चित्रपटाने मिळवून दिली आहे.
‘छावा’मध्ये विनीतने साकारलेल्या भूमिकेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. कवी कलश हे एक कवी आणि त्याचसोबत योद्धेसुद्धा होते. छत्रपती संभाजी महाराजांचे ते घनिष्ठ मित्र होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते महाराजांसोबतच राहिले. विनीतने ही भूमिका इतक्या कौशल्याने साकारली की कविता म्हणताना त्यांच्यातील निरागस कवी झळकून यायचा आणि ते जेव्हा हातात तलवार घेऊन शत्रूंच्या घोळक्यात उभे राहायचे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर रौद्रता झळकायची.
विनीतच्या करिअरमधील ही पहिलीच ऐतिहासिक भूमिका आहे. विनीतने याआधी ‘मुक्काबाज’, ‘रंगबाज’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘अग्ली’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. गेल्या 18 ते 20 वर्षांपासून तो अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. 28 ऑगस्ट 1978 रोजी वाराणसीमध्ये विनीतचा जन्म झाला. तो राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडूसुद्धा आहे. इतकंच नव्हे तर मेडिकल कॉलेजमध्येही त्याने अव्वल स्थान मिळवलं होतं. तो सीपीएमटी क्लालिफाइड आहे. इतकंच नव्हे तर तो परवानाधारक मेडिकल प्रॅक्टिशनरसुद्धा होता. त्याने आरए पोदार आयुर्वेद मेडिकल कॉलेजमधून आयुर्वेद, औषध आणि शस्त्रक्रिया या विषयात पदवी संपादित केली आहे. नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून आयुर्वेदात त्याने एमडी ही पदवी घेतली आहे.
आईवडिलांच्या इच्छेखातर विनीतने जरी वैद्यकीय शिक्षण घेतलं असलं तरी त्याचं अभिनेता बनायचं स्वप्न होतं. त्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षम घ्यायचं होतं. पण दबावामुळे ते शक्य झालं नाही. पण विनीतने त्याची अभिनेता होण्याची इच्छा कायम ठेवली. सुपरस्टार टॅलेंट हंट स्पर्धा जिंकल्यानंतर या शोचे परीक्षक महेश मांजरेकर यांनी त्याला संजय दत्तच्या ‘पिताह’ या चित्रपटा एक छोटीशी भूमिका दिली. हा चित्रपट फ्लॉप झाला होता. त्यानंतर त्याने महेश मांजरेकरांसोबत सहाय्यक म्हणून काम केलं. नंतर त्याला ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 2018 मध्ये त्याला ‘मुक्काबाज’मध्ये मुख्य भूमिका मिळाली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही.
‘मुक्काबाज’ या चित्रपटानंतर विनीतच्या हातात कोणतीच भूमिका नव्हती. अनेकदा त्याने या चित्रपटाच्या अपयशाबद्दल दु:ख व्यक्त केलं होतं. मात्र आता ‘छावा’ने विनीतला पुन्हा एकदा लोकप्रियता मिळवून दिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List