Chhaava: विकी कौशलच्या ‘छावा’ला चौथ्या दिवशी मोठा झटका
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ला प्रेक्षक-समिक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षक भावूक झाले आहेत. पाणावलेल्या डोळ्यांनी अनेकजण थिएटरमधून बाहेर येताना दिसत आहेत. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली झाल्याने त्याचाही फायदा पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या कमाईत झाला. आता चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. मात्र सोमवारच्या परीक्षेत विकी कौशलच्या या चित्रपटाला मोठा झटका बसल्याचं पहायला मिळतंय.
‘छावा’ने अवघ्या दोन दिवसांत कमाईचा 100 कोटींचा आकडा पार केला होता. आता ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी फक्त 24 कोटी रुपये कमावले आहेत. तसं पाहिल्यास हा आकडा काही वाईट नाही. मात्र गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत, चित्रपटाच्या कमाईची जी गती होती, ती मंदावल्याचं पहायला मिळतंय. ‘छावा’ची पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांची आणि दुसऱ्या दिवशी 37 कोटी रुपयांची कमाई झाली होती. रविवारी या चित्रपटाने सर्वाधिक गल्ला जमवला होता. पहिल्या रविवारी 48.5 कोटी रुपये कमावल्यानंतर सोमवारी त्या बरीच घट झाली.
विकी कौशलच्या ‘छावा’ने भारतात आतापर्यंत 140.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चार दिवसांमध्ये ही चांगली कमाई झाली आहे. या चित्रपटाचा एकूण बजेट 130 कोटी रुपये असल्याचं समजतंय. त्यामुळे बजेटचा आकडा कमाईतून वसूल झाला आहे. वीकेंडला प्रेक्षकवर्ग थिएटरमध्ये गर्दी करत आहेत, मात्र सोमवार ते शुक्रवारपर्यंत किती कमाई होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लवकरच विकी कौशल हा अभिनेता रणबीर कपूरसोबत एकाच चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांकडून या दोघांमध्ये तुलना होतेय. चौथ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत ‘छावा’ हा 25 व्या क्रमांकावर आहे. या यादीत रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट अग्रस्थानी आहे. तर रणवीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट सातव्या स्थानी आहे. रणबीरच्या ॲनिमलने चौथ्या दिवशी 40.06 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रणबीरचाच ‘संजू’ हा चित्रपट 23 व्या क्रमांकावर आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List