India Open Badminton 2025 – सिंधू, किरण उपांत्यपूर्व फेरीत
हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि नव्या दमाचा खेळाडू किरण जॉर्ज यांनी सरळ गेममध्ये विजय मिळवित इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. याचबरोबर सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानी जोडीने पुरुष दुहेरीमध्ये आगेकूच केली.
महिला एकेरीत सिंधूने जपानच्या मनामी सुईझूचा 21-15, 21-13 असा सहज धुव्वा उडविला, मात्र सिंधूने पहिल्या गेममध्ये 13-6 अशी आघाडी घेतल्यानंतरही तिला सुईझूने 13-14 पर्यंत अंतर कमी केले होते. त्यानंतर सिंधूने केवळ दोनच गुण गमावित पहिला गेम जिंकला. दुसऱया गेममध्ये सिंधूचे पूर्णतः वर्चस्व गाजवित विजयावर शिक्कामोर्तब केले. किरणने पुरुष एकेरीच्या दुसऱया फेरीच्या फ्रान्सच्या अॅलेक्स लॅनियरचा 22-20, 21-13 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये लॅनियरने 20-14 अशी आघाडी घेतली होती, मात्र किरणने लागोपाठ आठ गुणांची कमाई करीत अशक्य वाटणारा पहिला गेम जिंकला. मग दुसऱया गेममध्ये वर्चस्व गाजवित त्याने विजयाला गवसणी घातली.
सात्त्विक–चिराग जोडीचे पुनरागमन
सात्त्विक-चिराग या हिंदुस्थानच्या अव्वल जोडीने पहिला गेम गमावल्यानंतर जपानच्या केनिया मित्सुहाशी / हिरोकी ओकामुरा यांचा 20-22, 21-14, 21-16 असा पराभव केला. हिंदुस्थानी जोडीच्या हातातून चुरशीचा पहिला गेम निसटला, मात्र त्यानंतर योग्य ताळमेळ राखत या हिंदुस्थानी जोडीने पुढील दोन गेममध्ये बाजी मारत विजय मिळविला. स्पर्धेतील इतर अव्वल खेळाडूंमध्ये गत उपविजेत्या हाँगकाँगच्या ली चेऊक यिऊ याने टोमा ज्युनियर पोपोव्हचा 1 तास 16 मिनिटांच्या लढतीत 14-21, 21-18, 22-20 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List