महायुती सरकारमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे कुणी आहे का? आदित्य ठाकरे संतापले
अभिनेते सैफ अली खान यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. महायुती सरकारमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे कुणी आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात लिहिलेल्या पोस्टमध्ये सरकारला चांगलेच फटकारले आहे. सैफ अली खान यांच्यावरील हल्ला म्हणजे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे ढळढळीत उदाहरण आहे, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांतील हिट अॅण्ड रन प्रकरण, अभिनेते, अभिनेत्री, नेत्यांना दिल्या जाणाऱया धमक्या तसेच बीड-परभणीसारख्या घटनांवरून हे स्पष्ट होतंय की, हे सरकार राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात तसेच गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
‘सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा धक्कादायक आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे ऐकून बरं वाटलं. त्यांच्या आयुष्यावरील संकट टळलं असून आशा आहे की, लवकरच त्यांचे आयुष्य पूर्ववत होईल,’ असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List