Saif Ali Khan महाराष्ट्रात कुणीच ‘सेफ’ नाही, सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला

Saif Ali Khan महाराष्ट्रात कुणीच ‘सेफ’ नाही, सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला

गृह मंत्रालय सपशेल फेल ठरले आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा अक्षरशः मुडदा पडला आहे. राज्यात कुणीच ‘सेफ’ नाही, अशी भीतिदायक स्थिती निर्माण झाली असून प्रसिद्ध अभिनेता पद्मश्री सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसून काल मध्यरात्री त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने सैफला हेक्सा ब्लेडने भोसकले असून त्याच्यावर सहा वार केले. त्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे.रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रिक्षातून लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिवाचा धोका टळला आहे. दरम्यान, चोरीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे दिसत असून हल्लेखोर सीसीटीव्हीत पैद झाला आहे, मात्र तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. हल्लेखोराविरुद्ध घरात घुसणे, हत्येचा प्रयत्न करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

वांद्रे पश्चिमेकडील उच्चभ्रू वस्तीतील सत्गुरू शरण या इमारतीमधील 11 व 12 व्या मजल्यावर सैफ अली खान हा त्याची पत्नी अभिनेत्री करिना कपूर आणि दोघा लहान मुलांसोबत राहतो. बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक चोरटा सैफच्या 11 व्या मजल्यावरील घरात घुसला. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास सैफचा लहान मुलगा जहांगीर त्याच्या बेडरूममध्ये झोपला असताना त्यांच्यासोबत त्याची देखभाल करणाऱया स्टाफ नर्स एलियामा फिलिपा (54) आणि आया जुनू या दोघी झोपल्या होत्या. दरम्यान, काहीतरी आवाज आल्याने फिलिपा यांना जाग आली. त्यामुळे त्या उठून बसल्या. त्यावेळी त्यांना रूममधील बाथरूमचा दरवाजा उघडा व बाथरूमची लाईट चालू दिसली, पण करिना जहांगीरला भेटायला आल्या असाव्यात असे समजून फिलिपा पुन्हा झोपल्या, परंतु पुन्हा काहीतरी चुकीचे होत असल्याचा त्यांना भास झाला. त्यामुळे त्या पुन्हा उठून बसल्या. त्यावेळी बाथरूमच्या दरवाज्यावर एक टोपी घातलेल्या व्यक्तीची सावली त्यांना दिसली. त्यामुळे बाथरूममध्ये कोण आहे हे पाहण्याचा त्या प्रयत्न करीत असताना बाथरूममधून एक व्यक्ती बाहेर आला व तो जहांगीरच्या बेडजवळ जाऊ लागला. ते पाहून फिलिपा पटकन उठल्या व जहांगीरच्या बेडजवळ धावल्या.

आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत पळाले

त्याचवेळी जुनू ओरडत रूमच्या बाहेर गेली. तिचा आवाज एकून सैफ व करिना धावत रूममध्ये गेले. आरोपीस बघून सैफने त्यास ‘कोण है, क्या चाहिए?’ असे विचारले तेव्हा त्याने हातातील लाकडी वस्तू व हेक्सा ब्लेडने सैफवर हल्ला केला. त्यावेळी गीता मधे आली असता तिच्याशीदेखील हल्लेखोराने झटापट केली व तिच्यावरही हल्ला केला. त्यावेळी सैफने त्याच्यापासून कशीबशी सुटका करून घेत आम्ही सर्व रूमच्या बाहेर धावलो, असेही फिलिपा यांनी जबाबात म्हटले आहे.

हल्लेखोर मोलकरणीच्या ओळखीचा होता का?

हल्लेखोर सर्वप्रथम सैफच्या मुलांच्या बेडरूममध्ये शिरला होता. तेथे मोलकरणीशी वाद घातल्याने विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपासाची चव्रे फिरवली आहेत. अतिसुरक्षित सोसायटीत हल्लेखोर घुसला कसा? मोलकरीण रात्री सैफच्या घरी का राहिली? हल्लेखोराने तिच्याशी वाद का घातला? हल्लेखोर मोलकरणीच्या ओळखीचा होता का? हल्लेखोराला घरात प्रवेश देणारी तीच होती का? घटनेनंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी कसा झाला? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी काही जणांचे जबाब नोंदवून घेतले असून त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. हल्ल्याचा बिष्णोई टोळीशी संबंध असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली.

‘नो आवाज’ म्हणत एक कोटीची मागणी

मोलकरणीने पाहताच चोरटय़ाने तोंडाजवळ बोट नेऊन शुक शुक केले व ‘नो आवाज’ असे हिंदीत बोलला. त्याच वेळी जहांगीरची आया जुनूदेखील झोपेतून उठली. ते पाहून तो इसम तिलादेखील ‘कोई आवाज नही और कोई बाहर भी नही जाएगा’ असे बोलून धमकावले. नंतर फिलिपा यांच्या अंगावर धावून गेला. चोरटय़ाच्या डाव्या हातात लाकडासारखी वस्तू व उजव्या हातात लांब पातळ हेक्सा ब्लेड होते. झटापटीत त्याने फिलिपा यांच्या हातावर हेक्सा ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिलिपाने त्याला ‘आपको क्या चाहिए’, असे विचारले असता ‘पैसा चाहिए, वन करोड.’ असे आरोपी बोलल्याचे फिलिपा यांनी एफआयआर नोंदविताना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

हल्ल्यापूर्वी करिना गेली होती पार्टीला!

हल्ल्याची घटना घडण्यापूर्वी करिना ही करिश्मा व सोनम कपूरसोबत पार्टीला गेली होती. करिश्मा कपूरने इन्स्टाग्रामवर पार्टीसंबंधी पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने करिना, मैत्रीण रिया व सोनम कपूरसोबत पार्टी केल्याचे म्हटले होते. करिनाने ती पोस्ट शेअर केली होती.

सैफच्या घरातील तिघांची चौकशी

हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी सैफच्या घरातील तिघांची चौकशी केली. यामध्ये हल्ल्यात जखमी झालेल्या घरातील मोलकरणीचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी आले होते. पथकाने घर आणि इमारत परिसराची तपासणी केली.

जिवाचा धोका टळला

सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लॅस्टिक सर्जरी झाली आहे. दोन खोल जखमा आहेत. अडीच इंचाचे चाकूचे टोक त्यांच्या मणक्यातून काढण्यात आले. आता प्रकृती स्थिर आहे, जिवाला धोका नाही, असे लीलावती रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले.

एक कोटीची मागणी

सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर ‘आपत्कालीन मार्ग’ असणाऱया पायऱयांवरून सैफच्या घरात शिरला होता. तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये पैद झाला आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर तो दिसला. त्याने पळून जाण्यासाठीही त्याच पायऱयांचा वापर केला, अशी माहिती मुंबई पोलिसांचे उपायुक्त गेडाम दीक्षित यांनी दिली. हल्लेखोराने प्रथम 1 कोटींची मागणी केली व नंतर हल्ला केला, असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

18 पथकांमार्फत तपास

हल्लेखोराच्या शोधासाठी वांद्रे पोलीस ठाण्याची 10 पथके तसेच अधिक तपासासाठी गुन्हे शाखेची 8 पथके तयार करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेची खबर मिळताच सैफच्या घरी धाव घेतली आणि सखोल तपास सुरू केला आहे. तपास पथकामध्ये ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांचादेखील समावेश आहे. हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचा कसून शोध सुरू आहे.

कधी कधी अशा घटना घडतात, मुंबईला असुरक्षित म्हणणे अयोग्य

देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरे आहे की, कधी कधी काही घटना घडतात, त्याला गंभीरतेनेदेखील घेतले पाहिजे. पण तेव्हा त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असे म्हणणे यासाठी योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमादेखील खराब होते. पण मुंबई अत्याधिक सुरक्षित राहिली पाहिजे या दृष्टीने सरकार नक्की प्रयत्न करेल.

हे सगळं चिंताजनक

कायदा-सुव्यवस्था किती ढासाळलीय हे लक्षात येतेय. याच भागात एकाची हत्या झालीय, हा हत्येचा दुसरा प्रयत्न आहे. हे सगळं चिंताजनक आहेत. मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत, त्यांनी याकडे गांभीर्याने पाहावे, अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

मुंबईत भीतीचे वातावरण

सैफवरील हल्ल्याने मुंबईत सुरक्षिततेता मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच बिष्णोई टोळीकडून बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. त्याआधी दहशत पसरवण्यासाठी याच टोळीच्या शूटर्सनी अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर आता इमारतीला सुरक्षा असतानाही सैफवर घरात घुसून हल्ला झाल्याने मुंबईत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तहसीलदार अन् त्या राजकीय नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…मालेगावातील या गंभीर प्रकरणाबाबत किरीट सोमैया आक्रमक तहसीलदार अन् त्या राजकीय नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…मालेगावातील या गंभीर प्रकरणाबाबत किरीट सोमैया आक्रमक
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काही हजारो बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमैया आक्रमक झाल्या...
Ladki Bahin Yojana : प्रतीक्षा संपली! लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट
Saif Ali Khan Attack : हल्लेखोर पोलिसांनी असा हुडकून काढला? हे तंत्रज्ञान धावले मदतीला, तुम्हाला माहिती आहे का?
सरकारने दखल घेतली नाही, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे; सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची मागणी
Chhatrapati Sambhajinagar News- रेल्वे इंजिनवर चढलेल्या तरुणाने विजेच्या तारेला पकडलं, गंभीर भाजला
महाराष्ट्र सरकार, ऊर्जा विभाग सर्वोच्च न्यायालयाचं ऐकणार नाही का? मुनगंटीवारांचा खरमरीत सवाल
Mahakumbh Mela 2025 – पाप लागेल तुम्हाला…, साध्वी हर्षा रिछारियाला रडू कोसळलं; कुंभमेळा सोडणार