Sanju Samson – हजारे करंडकात न खेळणे सॅमसनला महागात पडणार
विजय हजारे करंडकाच्या सराव शिबिराला दांडी मारणाऱया संजू सॅमसनला चांगलेच महागात पडणार आहे. सराव शिबिराला पाठ दाखवल्यामुळे केरळच्या संघाने संजूला आधीच संघातून डच्चू दिले होते. तर आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानच्या संघनिवडीतून यष्टिरक्षक सॅमसनचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे स्पेशालिस्ट यष्टिरक्षक म्हणून के. एल. राहुलचाही विचार मागे पडला आहे. त्यामुळे दुसरा यष्टिरक्षक म्हणून ध्रुव जुरेल आणि इशान किशन यांच्यातच चुरस रंगणार असल्याचे हिंदुस्थानी निवड समितीच्या सूत्रांकडून कळले आहे.
येत्या एक-दोन दिवसांत आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानच्या बहुप्रतीक्षित संघाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्यात ऋषभ पंतचे स्थान पक्के आहे. त्यामुळे दुसऱया स्थानासाठी कुणाची वर्णी लावावी याचा विचार निवड समिती गांभीर्याने करतेय. राहुल आता हिंदुस्थानचा यष्टिरक्षणाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे तो यात मागे पडला आहे, मात्र जुरेलचे नाव वेगाने पुढे आले आहे.
इशान किशनसाठी गेले वर्ष फारसे उत्साहवर्धक गेले नसले तरी सध्या तो अव्वल तीन खेळाडूंमध्ये आहे. किशनने आपल्या 27 वन डे सामन्यांच्या कारकीर्दीत 42 धावांच्या सरासरीने 933 धावा ठोकल्या आहेत. मात्र गेल्या सत्रात देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे त्याला बीसीसीआयने केंद्रीय करारातून तडकाफडकी मुक्त केले होते.
नुकत्याच शेवटच्या टप्प्यात असलेल्या हजारे करंडकात किशनने 7 सामन्यांत 316 धावा केल्या आहेत. गेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये किशन खेळला असला तरी आता तो संघाची पहिली पसंत राहिलेला नाही. जुरेलने आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांसाठी संघात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पंतला जोडीदार म्हणून जुरेलचेच नाव आघाडीवर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List