साखळीत हिंदुस्थानी संघ अपराजित; हिंदुस्थानी महिलांची शतकी हॅटट्रिक, पुरूषांनीही भूतानचा उडवला फडशा
खो-खोचा जन्मदाता आणि भाग्यविधाता असलेल्या हिंदुस्थानने साखळीत आपला गुणांचा झंझावात कायम राखत आपले शिखरस्थान कायम राखले. हिंदुस्थानच्या पुरुषांनी भूतानचा 71-34 तर महिलांनी आपल्या शतकी घणाघाताची हॅटट्रिक साजरी करताना मलेशियाची 100-20 अशी धुळधाण उडवली. आता हिंदुस्थानच्या पुरुष संघाला उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी श्रीलंकेचा धुव्वा उडवावा लागणार आहे, तर महिलांना बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आणावे लागणार आहे. तसेच बांगलादेश, श्रीलंका, इराण या आशियाई देशांच्या दोन्ही संघांनी बाद फेरीत स्थान मिळवले असून दक्षिण आफ्रिकेचेही दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. आता शुक्रवारी महिलांचे चार आणि पुरुषांचे चार अशा आठ उपांत्यपूर्व लढती खेळल्या जातील.
खो-खो विश्वचषकात हिंदुस्थानच्या दोन्ही संघांची गुणांची लूट कुणीही रोखू शकला नाही. महिलांनी तर सलग तिसऱया सामन्यातही प्रतिस्पर्धी संघावर शतकी हल्ला चढवत महाविजयाची विक्रमी हॅटट्रिक साजरी केली. हिंदुस्थानी महिलांनी गेल्या दोन सामन्यांप्रमाणे आजही प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढूच दिले नाही. बचावपटू भिलार ओपिनाबेन आणि मोनिकाच्या खेळाने मध्यंतरालाच हिंदुस्थानला 44-06 अशी 38 गुणांची विजयी आघाडी घेऊन दिली होती. यानंतर या सामन्यावरही हिंदुस्थानचेच वर्चस्व राहिले. अन्य सामन्यांप्रमाणे या सामन्यातही एखाद्या खाटिकाप्रमाणे हिंदुस्थानी महिलांनी मलेशियन संघाचीही कत्तल केली. हिंदुस्थानी संघ गुणांची लयलूट करत असली तरी मलेशियन संघाला त्यांना तीळभरही लढत देता आली नाही. अस्सल खो-खो रसिकांना या सामन्यातही एकच संघ गुण घेताना दिसला. मग आक्रमण असो किंवा संरक्षण, इथे फक्त आपलीच चालते हे हिंदुस्थानी महिलांनी दाखवून दिले. चारही डाव हिंदुस्थानी संघानेच गाजवले.
भूतानचाही फिका खेळ
भूतानच्या संघाची खो-खोमध्ये बऱयापैकी प्रगती होत असल्याचे त्यांच्या खेळातून दिसत होते. पण आज त्यांचा खेळ हिंदुस्थानी वादळासमोर अक्षरशः पालापाचोळय़ासारखा उडून गेला. या सामन्यात हिंदुस्थानच्या सर्वच खेळाडूंनी आपले काwशल्य दाखरत आपल्या हवेत सूर मारण्याची वारंवार प्रात्यक्षिके सर्व संघांना दाखवली. पहिल्या डावापासून घेतलेल्या आघाडीला हिंदुस्थानी संघाच्या पुरुषांनी प्रत्येक डावाअखेर वाढवतच नेले. भूतानचा खेळ हिंदुस्थानसमोर उभाच राहू शकला नाही आणि 71-34 असा मोठा विजय हिंदुस्थानने सहज मिळवला. सुयश गरगटेला या ‘सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू’चा मान मिळाला.
दक्षिण कोरिया, अमेरिका बरोबरी
खो-खो विश्वचषकात दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातला सामना 62-62 असा बरोबरीत सुटला. दुबळय़ा संघांमधील हा थरार रंजक झालाच नाही. सामना बरोबरीत संपला आणि हे दोन्ही संघही बरोबरीने स्पर्धेबाहेर फेकले गेले. ‘क’ गटातून बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. ‘ड’ गटात एका चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मलेशियावर 35-34 अशी एका गुणाने मात केली, मात्र या गटातून इंग्लंड व केनियाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला गटातही आज सर्व सामने एकतर्फीच झाले.
हिंदुस्थानसह नेपाळ, बांगलादेश आणि इंग्लंडही अपराजित
हिंदुस्थानच्या पुरुष संघाने गटातील सर्व सामने सहज जिंकले. तसेच अन्य गटातील नेपाळ, बांगलादेश आणि इंग्लंडच्या पुरुष संघानेही आपापल्या गटातील चारही सामने जिंकत विजयी चौकार ठोकला. महिला गटात हिंदुस्थानसह नेपाळ आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी विजयी चौकार ठोकला.
आजच्या लढती (महिला)
युगांडा-न्यूझीलंड 10.30
द.आफ्रिका – इंग्लंड 13.00
नेपाळ – इराण 16.30
हिंदुस्थान–बांगलादेश 19.00
आजच्या लढती (पुरूष)
इराण – केनिया 11.45
इंग्लंड- द. आफ्रिका 15.15
बांगलादेश- नेपाळ 17.45
हिंदुस्थान–श्रीलंका 20.15
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List