धारावी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध तीव्र, भूमापन अधिकाऱ्यांना मालाडमधून पिटाळले
धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी जमिनीची मोजणी करण्याकरिता मालाड पश्चिम येथील आक्सा गावामध्ये आलेल्या नगर भूमापन अधिकाऱयांना आज गावकऱयांनी पिटाळून लावले. कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांची जमीन अदानींच्या घशात जाऊ देणार नाही, असा ठाम निधार यावेळी गावकऱयांनी व्यक्त केला.
धारावी पुनर्विकास प्रकल्प मालाडमधील आक्सा गावात राबवण्याची योजना आहे. प्रकल्पापूर्वी भूमापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जमीन मोजणीसाठी सकाळी साडेनऊची वेळ देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात सकाळी सहा वाजताच प्रचंड पोलीस बंदोबस्तात व गावकऱयांना अंधारात ठेवून भूमापन अधिकाऱयांनी जमीन मोजणी सुरू केल्याने गावकरी संतप्त झाले. गावकऱयांनी आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत हुसकावून लावले. यावेळी गावकरी प्रचंड आक्रमक झाले होते. त्यापूर्वी अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत गावकऱयांनी काही काळ मढ-मार्वे मार्ग रोखून धरला. कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांच्या हक्काच्या जमिनी अदानीच्या घशात जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी घेतली. यावेळी अस्लम शेख आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमकदेखील झाली. गावकऱयांना सोबत घेऊन अस्लम शेख यांनी थेट मालवणी पोलीस ठाणे गाठले.
गावकऱयांना अंधारात ठेवून केलेला सर्वे रद्द करा, अन्यथा भूमापन अधिकारी रणजित देसाई यांना जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका आमदार अस्लम शेख यांनी घेतल्याने मालवणी पोलीस ठाण्याबाहेरदेखील बराच काळ तणाव निर्माण झाला होता. यातील काही जमिनीबाबत श्री मुक्तेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व राज्य सरकार यांच्यामध्ये न्यायालयात वाद असताना व या जमिनीवर कोणतीही कार्यवाही करू नये, असे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानादेखील या जमिनीची मोजणी केली गेल्याने गावकऱयांनी यावर आक्षेप घेत नगर भूमापन अधिकाऱयांना या मुद्दय़ावरून घेरले. शेवटी नगर भूमापन अधिकाऱयांनी जमिनीची मोजणी झाली नाही असे लिखित स्वरूपात देण्याचे कबूल केल्याने ग्रामस्थ शांत झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List