महाराष्ट्रात गद्दार, भ्रष्टाचाऱ्यांना सुरक्षा, सामान्य मात्र असुरक्षित! संजय राऊत यांची टीका
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी सैफ अली खानवरील हल्ल्यावरून सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील 90 टक्के सुरक्षा ही गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी आणि बिल्डर्सना आहे, पण सर्वसामान्य जनता मात्र असुरक्षित आहे, पद्मश्री मिळालेली व्यक्तीही मुंबईत सुरक्षित नाही, असा जोरदार हल्ला त्यांनी सरकारवर चढवला. सरकार निवडणुका, सभा, संमेलने, उत्सव, प्रधानमंत्र्यांचे स्वागत, शिबिरे यामध्ये गुंतून पडल्याने बीडपासून मुंबईपर्यंत आणि चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाही. रस्त्यावर, घरात, झोपडीत, चाळीत कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसत आहेत. बॅंकांमध्ये घुसताहेत. आता मोठमोठे कलाकार आहेत, त्यांच्या घराबाहेर सुरक्षा आहे. त्यांना स्वत:लाही सुरक्षाव्यवस्था आहे. तिथेही चोर घुसतात आणि हल्ला करतात, असे संजय राऊत म्हणाले.
– सैफवरील हल्ला हा मोदींना धक्का आहे. कारण पंधरा दिवसांपूर्वी सैफ पंतप्रधानांच्या भेटीला सहकुटुंब गेले होते. त्यानंतर सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला. तो चोराने केला की कुणी केला हा पुढचा प्रश्न आहे. पण या राज्यात कुणीही सुरक्षित नाही. गृहमंत्र्यांनी हे समजून घेतले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
निष्क्रिय फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडावे -नाना पटोले
मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सैफ अली खानवरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे. हा जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असा निष्क्रिय व कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
हत्येचा उद्देश नाही, चोरीचा संशय -गृहराज्यमंत्री योगेश कदम
ही इमारत चार माळय़ांची आहे. इमारतीत सीसीटीव्ही कमी होते. त्यापैकी एका सीसीटीव्हीमध्ये त्याचा चेहरा समोर आला आहे. खबरींना त्याचा पह्टो वितरित करण्यात आला आहे. लवकरच त्याला पकडले जाईल. यामध्ये कुठलाही गँगचा अँगल नाही. त्या बिल्डिंगमध्ये पोलीस खात्याची कोणतीही सुरक्षा नव्हती, होती ती सर्व सुरक्षा ही खासगी होती. पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे चोर हत्येच्या उद्देशाने घरात शिरला होता असं वाटत नाही, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
गुजरातच्या तुरुंगातील गुंड निर्भयपणे गुन्हे करतोय -केजरीवाल
गुजरातच्या तुरुंगात बसलेला एक गुंड निर्णयपणे गुन्हे करत आहे. असे दिसते की, त्याला संरक्षण दिले जात आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. यापूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. नंतर राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. जर सरकार इतक्या मोठय़ा सेलिब्रिटींना सुरक्षा देऊ शकत नसेल तर सामान्य लोकांचे काय? डबल इंजिन सरकार ना सुशासन देऊ शकते ना लोकांना सुरक्षा, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
सुरक्षा असलेले लोकंच मुंबईत सुरक्षित नाहीत – वर्षा गायकवाड
मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं हे उदाहरण आहे. याआधीही वांद्रे परिसरात तीन मोठे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. ज्या ठिकाणी जास्त लोकांचा वावर आहे त्या परिसरात अशा प्रकारच्या घटना घडायला लागल्या आहेत. परभणी आणि बीड जिल्ह्यातील घटना, तसेच पुण्यातील कोयता हल्ल्याच्या घटना किंवा आता मुंबईतील तीन-चार घटना यावर आता गृहमंत्री फडणवीसांना उत्तर द्यावे लागेल, असे मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला असावा -जितेंद्र आव्हाड
हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो, असा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. गेली अनेक वर्षे ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असेही आव्हाड यांनी नमूद केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List