मंत्रालयातल्या गर्दीवर आता ‘एआय’चा उतारा, प्रवेशासाठी कडक सुरक्षा यंत्रणा; दलालांना बसणार चाप
मंत्रालयातल्या वाढत्या गर्दीवर मार्ग काढण्यासाठी आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची(एआय) मदत घेण्यात येणार आहे. मंत्रालयात गेल्या काही काळापासून व्हिजिटर्सची गर्दी आणि दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे एआयच्या मदतीने मंत्रालयात प्रवेशासाठी आता कडक आणि काटेकोर सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात येणार आहे.
मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठक आयोजित केली होती. ‘एआय’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानातून मंत्रालयात प्रवेश ते व्हिजिटर बाहेर पडेपर्यंतची व्यवस्था कार्यरत करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मंत्रालयात आधीच्या काळात आत्महत्या, आंदोलने असे अनेक प्रकार घडले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी मंत्रालयाच्या मधल्या चौकात सुरक्षा जाळीदेखील उभारण्यात आली. त्यावरही उडय़ा मारून आंदोलनांचे प्रकार घडले आहेत. याला पायबंद घालण्यासाठी आता कडेकोट सुरक्षा प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. मंत्रालयात येणाऱया प्रत्येकाचे फेशियल रिकग्नीशनदेखील होणार आहे. मंत्रालयात येण्यासाठी प्रत्येकाला नोंदणी करावी लागणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही नोंदणी ऑनलाईनदेखील करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्या व्यक्तीचा प्रवेश पास तयार होईल, जाताना तो त्या व्यक्तीला परत करावा लागेल. यामुळे कोण किती वेळ मंत्रालयात फिरत होता हे स्पष्ट होणार आहे.
जिल्हास्तरावरच तक्रारींचा निपटारा
मंत्रालयात येणाऱ्या 70 टक्के तक्रारी या जिल्हास्तरावर सुटणाऱ्या असतात. त्या घेऊन मंत्रालयात खेटे मारण्याची कोणावर वेळ येऊ नये यासाठी एक यंत्रणा उभारण्यात येईल. जेणेकरून या तक्रारी जिल्हा पातळीवरच सोडवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्याच्या कानाकोपऱयातून नागरिक मंत्रालयात येतात. त्यामुळे नागरिकांची संख्या वाढते. परिणामी मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. पण सुरक्षा व्यवस्था भक्कम रहावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) उपयोग करावा. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List