सरस्वती नदीचा शोध… प्रयागराजपासून कानपूरपर्यंत 12 हजार वर्षे प्राचीन जलधारा! हैदराबादच्या संशोधकांचे यश
गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्या भारतीय संस्कृतीच्या प्रवाही प्रवासाच्या साक्षीदार! गंगा, यमुनेचे अस्तित्व आपल्याला सध्या बघायला मिळते, परंतु सरस्वती मात्र काळाच्या ओघात लुप्त झाली. सरस्वतीचा शोध घेण्याचे काम हैदराबाद येथील राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेच्या वतीने करण्यात येत असून त्याला काही प्रमाणात यश आले आहे. प्रयागराज ते कानपूरपर्यंत 12 हजार वर्षे प्राचीन जलधारा आढळली आहे. पुंभ पर्व सुरू असतानाच ही सुखद वार्ता मिळाली आहे.
राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेच्या वतीने 2018 मध्ये सरस्वती नदीच्या पुरातत्त्वीय संशोधनास प्रारंभ करण्यात आला. या संशोधनात डेन्मार्कचे संशोधकही सहभागी झाले होते. आता हे संशोधन अंतिम टप्प्यात आले आहे. प्रयागराज, कोशाम्बी, पुंडा, फतेहपूरपासून पुढे कानपूरपर्यंत संशोधकांनी ड्रीलिंगच्या माध्यमातून पाण्याचे नमुने घेतले. त्याचबरोबर हेलिकॉप्टरच्या खाली लावण्यात आलेल्या हेलिबोन इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रणालीच्या माध्यमातून भूगर्भाचाही अभ्यास करण्यात आला. केंद्रीय जल बोर्डाने याच मार्गावर बोअरवेल घेतले. बोअरवेल घेताना भूगर्भात आढळलेला चिखल, मृदा, वाळू तसेच पाण्याचे नमुने कार्बन चाचणीसाठी घेण्यात आले. राष्ट्रीय भूभौतिक संस्थेचे संशोधक डॉ. सुभाष चंद्रा यांनी बोअरवेलमधून काढण्यात आलेल्या पाण्याचे वय निश्चित करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.
सरस्वतीच्या उपनद्यांचाही शोध लागला
राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेच्या या मौलिक संशोधनात सरस्वती नदीच्या काही उपनद्यांचाही शोध लागला आहे. कोशाम्बीपासून उगम पावणारी एक नदी वाकडातिकडा प्रवास करत परवेजपूर येथे यमुना नदीला जाऊन मिळत असल्याचे दिसून आले आहे. ही जलधारा 45 किमी लांब आणि चार ते सहा किमी रुंद आहे. नदीचा मुख्य प्रवाह पुढे कोशाम्बीपासून 160 किमी पुढेपर्यंत कानपूर, गजनेरपर्यंत आढळून आला आहे. फतेहपूरपासून निघालेली एक उपनदी बिंदकी, देवकली असा प्रवास करत बिल्हौरपर्यंत गेली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List