बीड जिल्ह्यात चाललंय काय? अंबाजोगाईत दिवसाढवळ्या गावठी कट्ट्यानं गोळीबार, शहरात दहशतीचं वातावरण
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या बीड जिल्हा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात चर्चेत आला आहे. यासह बीड आणि आसपासच्या भागात सहजासहजी मिळणाऱ्या गावठी कट्ट्याचीही चर्चा सुरू आहे. कोणताही परवाना नसताना गावठी कट्टे बाळगणाऱ्या अनेकांवर पोलीस कारवाई सुरू आहे. अशातच अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात कौटुंबीक वादातून गावठी कट्ट्याने गोळीबार करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून शहरात दहशतीचे वातावरण आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हा राज्यच नव्हे तर देशात गाजत आहे. अशातच अंबाजोगाई शहरात सुजित सोनी या व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटण्यात आले. ही घटना ताजी असतानाच शहरातील मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊली नगरमध्ये राहात असलेल्या सिद्धेश्वर नवनाथ कदम याच्यावर गणेश पंडित चव्हाण (रा. गोविंद नगर, ता. रेणापूर) याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा सिद्धेश्वर कदम यांच्या पत्नीला गेल्या काही दिवसांपासून कौटुंबीक वादातून सतत धमकी देत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्याविरोधात शहर पोलीस स्थानकात तक्रारही देण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी तो पुन्हा कदम यांच्या घरी आला आणि वाद घालू लागला. यावेळी त्याने सिद्धेश्वरच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने गोळी लागली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
आरोपी तरुणाकडे कुठलाही शस्त्र परवाना नसून त्याने गावटी कट्ट्याचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घोळवे करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List