फॉर्मात यायचेय तर देशांतर्गत क्रिकेट खेळा, युवराजचा रोहित-विराटला सल्ला
एकेका धावेसाठी झगडत असलेल्या दिग्गज फलंदाजांना फॉर्मात यायचे असेल तर त्यांनी आपल्या स्टेटसचा विचार न करता थेट देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवे, असा मोलाचा सल्ला हिंदुस्थानचा महान अष्टपैलू युवराज सिंगने धावांच्या शोधात असलेल्या दिग्गजांना दिला आहे. सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहलींच्या बॅटमधून धावांचा झरा आटल्यामुळे त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवे, असा मतप्रवाह चोहोबाजूंनी वाहत असताना युवराजच्या प्रतिक्रियेनंतर वातावरण आणखी तापणार हे निश्चित आहे.
नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर करंडकात हिंदुस्थानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता आणि या पराभवाचे खापर सर्वांनीच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अपयशी फलंदाजीवर फोडले होते. या पराभवानंतर या महान फलंदाजांनी आपले अपयश धुऊन काढण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवे, असा जोर वाढू लागला आहे.
याबाबत युवराजही स्पष्ट म्हणाला, देशांतर्गत क्रिकेट महत्त्वाचेच आहे. जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असाल तर प्रामुख्याने तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळायलाच हवे. हा सराव करण्याचा आणि सामने खेळण्याचा सर्वोत्तम प्रकार आहे. जर तुम्ही जखमी नसाल तर या क्रिकेटशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताही नाही, अशी भावना युवराजने सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या उद्घाटनप्रसंगी बोलून दाखवल्या.
सुनील गावसकर, रवी शास्त्री आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हिंदुस्थानच्या मानहानीकारक पराभवानंतर अपयशी खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असे म्हटले होते. रोहित शर्माने या सर्वांच्या सल्ल्याचा मान ठेवत मुंबईच्या मैदानात उतरून सरावात भाग घेतला आहे.
येत्या 23 जानेवारीपासून रणजी करंडकाचा दुसरा टप्पा सुरू होत असून त्यात रोहितच्या समावेशाची शक्यता आहे, मात्र विराट कोहलीबाबत अद्याप कोणतेही संकेत दिल्ली संघटनेला मिळालेले नाही. ऋषभ पंत, यशस्वी जैसवाल आणि शुभमन गिलसारख्या खेळाडूंनी आपली उपलब्धता संघटनेला कळवली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List