ग्राहक आयोगाने तडजोड घडवून आणली… अन् 16 शेतकऱ्यांना मिळाले 30 लाख 40 हजार !
शेतकऱ्याचा शेतात काम करताना आणि इतरत्र अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या नुकसानभरपाईसाठी सुनावणीसाठी आलेल्या प्रकरणात जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा डोल्हारकर यांनी मध्यस्थी केली आणि 16 प्रकरणात शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तात्काळ भरपाई देण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा ग्राहक आयोगाच्या कार्यालयातच शेतकऱ्यांना 30 लाख 40 हजार रुपयांचे भरपाईचे धनादेश देण्यात आले. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.
शेतात काम करताना सर्पदंश, विजेचा झटका लागल्याने किंवा इतर कारणाने अपघाती मृत्यू झाल्यास अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी, यासाठी सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे. सरकारकडून या विमा कंपनीला प्रिमियम दिला जातो. जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरू होण्यापूर्वी जिल्हयातील 13 शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून विमा कंपनीकडे दावा दाखल करण्यास विलंब झाला. त्यामुळे विमा कंपनीने हे दावे फेटाळले होते. अॅड. परमेश्वर कुबेर हे शेतकऱ्यांना या योजनेत भरपाई मिळावी, यासाठी राज्यभरात न्यायालयीन लढाई लढतात. त्यांनी या 13 शेतकऱ्यांच्या विम्यासंदर्भात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे याचिका दाखल केल्या. यावर काही सुनावण्या झाल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा डोल्हारकर, सदस्य गणेशकुमार सेलूकर आणि जान्हवी भिडे यांनी शेतकयांच्या कुटुंबियांना विमा कंपनीकडून भरपाई मिळावी, यासाठी मध्यस्थी केली. विमा कंपनीचे वकील अॅड. शेखर टी. अग्रवाल हे सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले होते. आयोगाकडून करण्यात आलेल्या मध्यस्थीला त्यांनी प्रतिसाद दिला. पक्षकाराचे वकील परमेश्वर कुबेर, त्यांचे सहकारी अॅड. बसंत शेळके यांनी तडजोड केली. त्यानंतर विमा कंपनीने भरपाई देण्याचे मान्य केले आणि 16 प्रकरणातील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आज 8 जानेवारी रोजी जिल्हा ग्राहक आयोगाच्या कार्यालयातच भरपाईचे धनादेश देण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List