गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका, शरद पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी मोकाट आहेत आणि या घटनेला मोठी गुन्हेगारी पार्श्वभुमी आहे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते.
तसेच बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत.
असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी शरद पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी… pic.twitter.com/utwEDgoKMQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 6, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List