डोंबिवलीकरांना वाहतूककोंडीचा ‘हेडॅक’, नियोजनशून्य कारभाराचा फटका
शहरात संथ गतीने सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे डोंबिवलीकरांना वाहतूककोंडीचा अक्षरशः ‘हेडॅक’ झाला आहे. नियोजनशून्य कारभारामुळे रहदारीचे रस्ते अचानक बंद केले जातात. कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्त्यांची कामे सुरू केल्यामुळे 10 मिनिटांच्या प्रवासासाठी अर्ध्या तासाची रखडपट्टी सहन करावी लागत आहे. वाहनचालक शॉर्टकटचा मार्ग निवडून आपल्या दुचाकी थेट फुटपाथवरून नेत आहेत.
कल्याण-डोंबिवलीत केडीएमसी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांच्या वतीने रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. पालिका निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी झटपट कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत. रस्ते काँक्रीटीकरणासाठी आणलेले साहित्य, अवजारे, जेसीपी, बुलडोझर काम झाल्यावरदेखील रस्त्यावरच ठेवण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे.
ट्रॅफिक वॉर्डन नाही
डोंबिवली पूर्वेतील शहीद भगतसिंग रोडवर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनचालकांना लांबचा वळसा घालून जावे लागत आहे. या रस्त्यावर बेशिस्त वाहनचालकांनी आपल्या गाड्या कशाही पार्क केल्यामुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. तर टाटा पॉवर लाइन रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये यासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करा, अशी मागणी डोंबिवलीकरांनी केली आहे. वाहतुकीचे कोणतेही नियोजन न केल्याने वाहतूककोंडी ही गंभीर समस्या बनली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List