विद्यार्थ्यांनी दिले सोशल मीडिया सुरक्षिततेचे धडे, रेझिंग डे सप्ताहनिमित्त ठाणे नगर पोलिसांचा उपक्रम
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली आहे. विविध प्रकरणामध्ये अडकवण्याची धमकी तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून भामट्यांकडून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. या सर्व घटनांपासून ठाणेकरांना सतर्क करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आज पथनाट्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया सुरक्षिततेचे धडे दिले. रेझिंग डे सप्ताहनिमित्त ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
गौतम हिंदी विद्यालय व जोशी-बेडेकर शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने ठाणे नगर पोलिसांनी रेझिंग डे साजरा केला. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी बाजारपेठ परिसरात पथनाट्य सादर करत नागरिकांमध्ये जनजागृती केली. ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याने त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे. तसेच फसवणुकीचा प्रकार घडल्यास पोलीस ठाण्यात धाव घेत त्वरित तक्रार नोंदवण्याचा संदेशही यावेळी विद्यार्थ्यांनी दिला.
शस्त्रांचे प्रशिक्षण
रेझिंग डेनिमित्त उपस्थित शाळेतील विद्यार्थ्यांना नगर पोलिसांनी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. चितपट, गेम किंवा खेळण्यातील बंदुकीचा आनंद लुटणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरे पिस्तूल हातात घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. दरम्यान पोलिसांबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांना कायदे व गुन्ह्यांचे प्रकार, न्यायालयीन कामकाज तसेच पोलीस ठाण्यातील कामकाज कसे चालते याबाबतची माहिती पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List