पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
महाराष्ट्रातील वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरला मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला. दिव्यांग आणि ओबीसी आरक्षणाचा लाभ उठवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी पूजा खेडकरने कागदपत्रांमध्ये फेरफार केला. नावात बदल करण्याबरोबर बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षणाचा फायदा घेतला. याप्रकरणी यूपीएससीने एफआयआर दाखल केल्यानंतर पूजाला सनदी अधिकारी पद गमवावे लागले. या फसवणुकीच्या गुह्यात अटक टाळण्यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला होता.
देशाच्या प्रतिमेला धक्का
पूजा खेडकरने केलेल्या कृत्यामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. तिने कागदपत्रांमध्ये फेरफार करून समाजातील वंचित घटकांच्या योजनांचा लाभ उठवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात तिच्याकडे आलिशान कार व विविध मालमत्ता आहेत.
हेराफेरीच्या कटाचा भाग
पूजाचे कृत्य यूपीएससीच्या प्रणालीत हेराफेरी करण्याच्या मोठय़ा कटाचा भाग आहे. यूपीएससी जगातील प्रतिष्ठत परीक्षांपैकी एक आहे. लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. पूजाने केवळ एका संस्थेची नव्हे, तर देशाची फसवणूक केली, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List