रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार; मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टर योजना
मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार असून त्यामुळे मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील, असा निर्णय सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. धोकादायक इमारतींतील रहिवाशांसाठी संक्रमण शिबीर तयार करा. तसेच मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी विविध योजनांचे सादरीकरण केले.
‘सर्वांसाठी घरे’ ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा. याबाबत सविस्तर धोरण महिनाभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज सुलभपणे लाभ घेता यावा यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा. अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर 1, 2 आणि 3 वसाहतींचा पुनर्विकास, कामाठीपुरा क्षेत्राचा म्हाडामार्फत पुनर्विकास, पोलिसांसाठी घरे, गिरणी कामगारांसाठी घरकुल योजना, जीटीबी नगर येथील पुनर्वसन प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना आदीबाबत आढावा घेण्यात आला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, डॉ. महेंद्र कल्याणकर, मिलिंद बोरीकर, मिलिंद शंभरकर उपस्थित होते.
रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन आणि इतर पुनर्वसन रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट आहे. एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्यामार्फत माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर या झोपडय़ांचा पुनर्विकास केला जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List