आंदोलनासाठी पूर्वपरवानगी का मागता, परिपत्रक रद्द करा! युवा सेनेची विद्यापीठावर धडक
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित प्रश्नांसाठी विविध विद्यार्थी संघटना लोकशाही मार्गाने आंदोलने करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देत असताना विद्यापीठाने आता या आंदोलनांसाठी पूर्वपरवानगी घ्यावीच लागेल, असे मनमानी परिपत्रक जारी केले आहे. याची गंभीर दखल घेत युवा सेना सिनेट सदस्यांनी विद्यापीठावर धडक देत कुलगुरूंची भेट घेतली. आंदोलनासाठी पूर्वपरवानगीचे परिपत्रक मागे घ्या, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख–आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, मयूर पांचाळ आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन 20 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेले परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली.
या परिपत्रकानुसार विनापरवानगी विद्यापीठाच्या कोणताही परिसर अथवा उप परिसर येथे आंदोलन करणे बेकायदेशीर असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. परंतु विद्यापीठात विद्यार्थी/विद्यार्थिनींना मिळणाऱ्या असुविधांमुळे त्यांना स्वतः किंवा विद्यार्थी संघटना आंदोलने करतात त्यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल यावेळी कुलगुरूंसमोर उपस्थित करण्यात आला. तर परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय तातडीने घेतला नाही तर युवा सेनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List