‘शिर्डीतील मोफत जेवण बंद करा, महाराष्ट्राचे सगळे भिकारी येथे गोळा झालेत’, साईभक्तांबाबत सुजय विखेंचं आक्षेपार्ह वक्तव्य
शिर्डीतील साई संस्थानच्या भोजनालयात भक्तांना मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. यावरच आक्षेप घेत भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साईभक्तांबाबत अवमानजनक शब्दांचा वापर केला आहे. देशातील सगळेच भिकारी शिर्डीत गोळा झाले आहेत, असं आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलं आहे. यामुळे अनेक साईभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
काय म्हणाले सुजय विखे?
साईभक्तांबाबत अवमानजनक शब्दांचा वापर करत सुजय विखे पाटील म्हणाले की, ”साई संस्थानच्या भोजनालयात आपण मोफत जेवण देत आहोत, यासाठी 25 रुपये घेतले पाहिजेत. यातून जो पैसा वाचेल तो आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश येथे येऊन फुकट जेवतोय. महाराष्ट्राचे सगळे भिकारी येथे गोळा झाले आहेत.”
हा साईभक्तांचा अपमान – मिंधेंचे मंत्री
दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर आता मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. हा साईभक्तांचा अपमान असल्याचं ते म्हणाले आहेत. शिरसाट म्हणाले की, ”शिर्डीतील साई संस्थानला जगभरातील लोक श्रद्धेपोटी कोट्यवधींची देणगी देतात. येथे येणारा भाविक हा आंध्रामधून दुपारी जेवायला येत नसेल. अन्नदान हे चांगलं काम आहे. देशातील किंवा महाराष्ट्रातील भिकारी येऊन तिथे जेवतो आणि जेवणासाठी तो तिथे येतो, असं म्हणणं साईभक्तांचा अपमान आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List