देशमुख हत्याप्रकरणामुळे यांनी बीडचा बिहार नाही तर हमास, तालिबान केला; सुरेश धस यांची टीका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहे. आता या घटनेमुळे बीडची आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. या लोकांनी बीडचा बिहार नाही, तर हमास, तालिबान केला आहे, अशी टीका सुरेश धस यांनी केली आहे. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी यांच्या विरोधात बोलतोय असं नाही. जोपर्यंत संतोष देशमुखचे मारेकरी फासावर जात नाही तोपर्यंत मनात राग ठेवा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांनी बीडचा बिहार नाही तर हमास, काबुलीस्तान आणि तालिबान केला असल्याची टीका सुरेश धस यांनी केली. संतोष देशमुख तिसऱ्यांदा सरपंच झाला. पण अजून त्याच्या कुटुंबीयांना राहायला घर नाही. त्यांना न्याय मिळालं पाहिजे, यात कसलं राजकारण आहे?, असा सवालही धस यांनी केला.
मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिनखात्याचा मंत्री करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली. या आधी अनेकांनी राजीनामा दिले. आर आर पाटील, विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. महायुतीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो. यांचा राजीनामा घ्या, आमच्या मुलाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List