त्यांच्याकडून वंजारी समाजाचा वापर होतोय; अंजली दमानिया यांचा धनंजय आणि पंकजा मुंडेंवर हल्लाबोल
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच आता त्यांनी पुन्हा एकदा धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्याकडून वंजारी समाजाचा वापर केला जात आहे. तसेच आपला मानसीक छळ करण्यात येत असल्याचा आरोपही दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी पत्रकार परिषेद घेत याबाबत आरोप केले आहेत.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला मानसीक छळ होत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत, नरेंद्र सांगळे या व्यक्तीचा हा फोन आहे. मला चार दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, फोन अजून बंद झालेले नाहीत, असे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे.
अंजली दमानिया यांनी सांगितले की, मी दोन विधानं केली होती. उच्चपदांवर वंजारी समाजातील व्यक्ती आहेत, असं आपण म्हणालो होतो. त्यात आपण कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोललेलो नाही. हा समाज आळशी आहे, असं मी कुठेही म्हंटलं नाही. समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचे काम केले गेले. सानप, मुंडे उच्च पदावरील माणसं परळीतच का? यासंदर्भात मी बोलले आणि ते लिहिलं देखील होतं आणि दाखवलं होतं. मी अभ्यासपूर्वक बोलले होते. उच्च पदावरील माणसं फक्त परळीमधील का? असा माझा सवाल होता, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
वंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून होतोय, यात शंका नाही. शिक्षक भरतीसंदर्भात याचिका दाखल झाली होती. बिंदू नामावली निभावू, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट करत त्याला स्थगिती दिली आणि हे फॅक्ट आहे. मी पेपरशिवाय बोलत नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट दाखवले. आता त्यांनी अख्खी फौज माझ्या मागे लावली आहे. नरेंद्र सांगळे यांनी माझा नंबर फेसबुकवर टाकलाय, फोन उचलत नाही तोपर्यंत कॉल करत राहा, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. बाजारु कार्यकर्ते म्हणत ट्वीट करायला लागलेत. सुनिल फड यांनी देखील तसंच केले आहे. सुनील फड नावाच्या व्यक्तीकडून माझ्यावर अश्लील कमेंट केल्या आहेत. खालच्या दर्जाच्या कमेंट करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, आज चौथा दिवस आहे आणि फोन बंद झालेले नाहीत. हे सगळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी या पोस्टच्या छायांकित प्रती आणल्या होत्या. त्याही त्यांनी माध्यमांसमोर दाखवल्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली एसआयटी बरखास्त करावी. नवीन एसटी स्थापन करा, त्यासाठी राज्याबाहेरून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List