रवींद्र नाट्य मंदिरमध्ये लवकरच तिसरी घंटा; फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे निर्देश
गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेले प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर लवकरच नाट्यरसिकांसाठी खुले होणार आहे. रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले करून देता येईल या दृष्टीने कामाचे नियोजन करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज दिले.
नाट्यगृहाचे नूतनीकरण करत असताना कलावंत व प्रेक्षकांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून रवींद्र नाट्य मंदिरात नाटक अथवा सिनेमासुद्धा पाहता येणार आहे. त्यासाठी मोठी एलईडी स्क्रिन व सिनेमासाठी आवश्यक असणारी डॉल्बी साऊंड सिस्टमसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर नाटकांसाठी लागणारी साऊंड सिस्टमसुद्धा अद्ययावत करण्यात आली असून आसन व्यवस्थासुद्धा आरामदायी करण्यात आली आहे. तसेच मिनी थिएटरमध्येसुद्धा अशाच प्रकारे नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यासह सिनेमासाठीही सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून नाटक, सांस्कृतिक, संगीत, साहित्यिक कार्यक्रमांसह मराठी सिनेमांसाठी ही दोन थिएटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कलावंतांना जशा आवश्यक आहेत त्या पद्धतीने सुसज्ज असे मेकअप रूम व थिएटरच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून कलादालन व इतर दालनेसुद्धा अत्यंत देखण्या स्वरूपात उभारली जात आहेत.
वास्तूला मराठेशाहीचा साज
या संपूर्ण वास्तूला मराठेशाहीचा साज चढवण्यात येणार असून आतील भागात मराठी कला संस्कृती व नाटय़ परंपरेचा विचार करून सजावट करण्यात येणार आहे. आज मंत्री अॅड. आशीष शेलार यांनी या संपूर्ण कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले तसेच काही सूचनाही केल्या. सध्या सुरू असलेले काम जलदगतीने पूर्ण करत फेब्रुवारी अखेरपर्यंत संपूर्ण वास्तू आणि सर्व दालने खुली होतील या पद्धतीने कामाचे नियोजन करा, असे निर्देशही आशीष शेलार यांनी यावेळी दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List