स्वयंपाकघर – यशस्वी संसाराची रेसिपी
>> तुषार प्रीती देशमुख
स्वयंपाक करण्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर स्वयंपाक करणं सोपा असतो. स्वयंपाक करण्याचा कंटाळा येत असेल तर स्वयंपाक न करण्याची अनेक कारणं असतात. मात्र बागेश्री रवींद्र खोपडे ताईबाबत म्हणाल तर स्वयंपाक करणं हे तिचं पॅशनच आहे.
बागेश्रीताईंचे पती रवींद्र हे माझे मित्र झाल्यापासून त्यांच्या घरी गौरी-गणपती, सत्यनारायण पूजेला जाण्याची प्रथा कायम झाली आहे. त्यांच्या घरी पहिल्यांदा गौरीच्या निमित्ताने दर्शनाला गेलो तेव्हा बागेश्रीताईंची व त्यांच्या आईची धावपळ पाहून थक्क झालो. छोटेसे घर पण त्यातही त्यांनी केलेली आरास आणि स्वयंपाक, घरातून येणारा पदार्थांचा खमंग दरवळ जणू प्रत्येक पदार्थाची ओळखच करून देत होता. स्वयंपाक घरात पाहिले तर त्यांना उभे राहण्यासाठी कमी जागा असूनही त्यांचे स्वयंपाक घर स्वच्छ होते. प्रत्येक पदार्थासाठी लागणाऱया साहित्याची योग्य मांडणी केली होती. स्वयंपाक करण्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर स्वयंपाक करण सोपे असते. स्वयंपाक करण्याचा कंटाळा येत असेल तर मग स्वयंपाक न करण्याची अनेक कारणे सांगितली जातात.
बागेश्रीताईं त्यांच्या आईच्या मदतीने सर्व आवराआवर करून लगबगीने बाहेर निघाल्या. जाता जाता म्हणाल्या, ‘थोडं ऑफिसचं काम आहे. आटपून तासाभरात येते.’ तेव्हा समजले बागेश्रीताई शासकीय नोकरीत असून मोठय़ा हुद्दय़ावर आहेत. सुट्टी असली तरी काम असेल तर त्यांना जावं लागतं. त्यांची कोणतीही तक्रार नसते. हसतमुखाने त्यांनी आपली कामे स्वीकारल्याने त्या सगळ्या जबाबदाऱया सहजपणे पार पाडताना दिसत होत्या.
बागेश्रीताईंच्या आई वंदना नंदकुमार कवळे या सुरुवातीपासूनच खूप कष्टाळू आहेत. पतीनिधनानंतर चार मुलींची जबाबदारी स्वीकारत वंदनाताईंनी पाळणाघर चालवले. पहिली ते चौथी इयत्ताच्या शिकवण्या घेतल्या. त्यांच्या हाताला चव असल्यामुळे त्यांनी पुरणपोळीचाही व्यवसाय केला. बागेश्रीताईंनीदेखील शिकवण्या घेतल्या. आईच्या हाताखाली स्वयंपाकाचे धडे घेउढन त्या अनेक पदार्थ रुचकर बनवू लागल्या. वयाच्या 21 व्या वर्षी त्या शासकीय सेवेत रुजू झाल्या. आईकडून त्यांनी एक शिकवण नक्कीच घेतली होती आणि ती म्हणजे नोकरी करून घर सांभाळणे.
बागेश्रीताईंचा 24 व्या वर्षी रवी खोपडे यांच्याबरोबर संसार सुरू झाला. नवरादेखील शासकीय नोकरीत होता. दोघांच्याही कामाच्या शिफ्टच्या वेळा कधी सारख्या असायच्या, तर कधी नसायच्या. एकत्र कुटुंब असेल तर नेहमीच एकमेकांना एकमेकांची मदत होत असते. बागेश्रीताईंना त्यांच्या सासूबाई सुशीला नामदेव खोपडे यांची खूप मदत असायची. सासूबाईंकडून त्या अनेक पारंपरिक पदार्थ शिकल्या. ज्यात संक्रांतीच्या भोगीच्या भाजीचा उल्लेख त्यांनीआवर्जून केला. नवऱयाला आईच्या हातचे आवडणारे पदार्थ तसंच नणंद सुरेखा सुभाष काकडे यांच्याकडून थालीपीठ, उडदाचं घुटं इत्यादी पदार्थ शिकून घेतले. हे सगळं करत असताना त्यांना नोकरीत मोठय़ा हुद्दय़ावर बढती मिळाली. नोकरी व घरातली जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी मुलाला योग्य संस्कारात वाढवले. आई व सासूबाईंकडून शिकलेले पारंपरिक पदार्थ सणावाराला किंवा एरवीही त्या बनवून त्याला खाऊ घालतात. त्यामुळे सर्वेशलाही त्या सर्व पदार्थांची आवड निर्माण झाली आहे.
रवींद्रदादांच्या मित्रपरिवार मोठा असल्याने त्यांच्याकडे नेहमीच कोणता ना कोणता ग्रुप जेवायला असायचा. त्या सगळय़ांना वेगवेगळे पदार्थ बनवून बागेश्रीताई तृप्त करायच्या. बागेश्रीताईंच्या मैत्रिणीदेखील कधी सणवाराला येतात आणि आम्ही कधी तिच्याकडे जेवायला जातोय याची वाट पाहतात.
बागेश्रीताईंनी त्यांच्या नोकरीमधल्या सगळय़ा आव्हानांना सकारात्मकतेने झेलून त्यांच्या सहकाऱयांनाही मदत केली आहे. मोठय़ा हुद्दय़ावर असूनही त्या आाफिसमधल्या तरुणींना स्वयंपाकाची आवड जोपासून संसार व नोकरी सांभाळून आनंदी कसं राहायचं याबद्दल पटवून देतात. मुलगा सर्वेशला आईच्या हातची ऋषीची भाजी व सर्व प्रकारचे मांसाहारी पदार्थ आवडतात. याचं श्रेय बागेश्रीताई आपल्या आईला देतात. ‘हे पदार्थ आई व सासूबाईंकडून शिकले म्हणून करू शकले. नोकरी करून संसार सांभाळणं शक्य असतं. पण आपल्या माणसांसाठी स्वयंपाक करण्यातच खराखुरा आनंद आहे. पण त्याच वेळी त्यांची दाद मिळणंदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. नोकरी करून घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी, मित्रपरिवारासाठी स्वयंपाक बनवण्यासाठी लागते ती इच्छाशक्ती आणि आवड. नोकरीचं कारण देऊन सणावाराला जर घरी पारंपरिक पदार्थ बनले नाहीत तर पुढच्या पिढीसाठी ते पदार्थ लुप्त होतील.
नोकरी व संसाराचे आव्हान मी माझ्या आई व सासूबाईंमुळे यशस्वीरीत्या पेललं. आता माझ्या सुनेलाही मदत करून तिल नोकरी, संसार व स्वयंपाकघर यशस्वीरीत्या पेलवण्यासाठी सज्ज करत आहे.’ हे आनंदाने सांगणाऱया बागेश्रीताईंकडून हीच प्रेरणा मिळते की, नोकरी करून संसार उत्तमरित्या सांभाळता येऊ शकतो. सर्वांना पदार्थ खाऊ घालण्यातच खरा आनंद आहे. नोकरी, संसार, स्वयंपाकघर यशस्वीरीत्या न थकता आनंदाने सांभाळणाऱया बागेश्रीताईंसारख्या महिलांकडून यशस्वीरीत्या संसार सांभाळण्याची गोड रेसिपी नक्कीच शिकण्यासारखी आहे.
[email protected]
(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List