राज्यात दहशतीचे वातावरण! देशमुख कुटुंबाला शरद पवार यांनी दिला धीर
राज्यात दहशतीचे वातावरण आहे. पण दहशतीच्या सावटाखालून बाहेर पडा. या संकटाला आपण सगळे मिळून तोंड देऊ. संपूर्ण राज्य देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडकरांना धीर दिला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर उभा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मस्साजोगच्या गावकऱ्यांसह बीड जिल्हा दहशतीखाली आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग येथे भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे, खासदार नीलेश लंके, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते उपस्थित होते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे सांत्वन केल्यानंतर शरद पवार यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास खोलात जाऊन करण्याची गरज आहे. देशमुख कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत केली आहे, पण या मदतीने दुःख कमी होणार नाही. या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी प्रकरणाच्या खोलात जाऊन खऱया सूत्रधारांना धडा शिकवला पाहिजे. मी इकडे याच कारणासाठी आलो आहे. बीड जिह्यातील घडलेली ही घटना महाराष्ट्राला न शोभणारी आहे, असे शरद पवार म्हणाले.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची घटना अस्वस्थ करणारी
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे. सरकारने या प्रकरणात तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती आपण सरकारच्या निदर्शनास आणून देऊ, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी आज परभणीत पोलीस अत्याचाराचा बळी ठरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी तसेच दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List