शिक्षकाची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोकले शाळेला कुलूप; संजीवनी शिक्षण संस्थेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन
दोन वर्षांपूर्वी बदलून आलेले शिक्षक विजय लोहार यांच्यामुळे शाळेची स्थिती सुधारत आहे. संस्थेच्या अंतर्गत राजकारणातून त्यांची पुन्हा बदली करण्यात येत आहे. शिक्षक लोहार यांची बदली रद्द करा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेटला कुलूप ठोकले आहे. दरम्यान, गावकरी आणि पालक यांनीही मुख्याध्यापकांना निवेदन देत बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.
संजीवनी शिक्षण संस्थेची पहिली मूळ शाखा शेणोली (ता. कराड) या ठिकाणी असून, अनेक वर्षं शाळा सुरू आहे. शिक्षणातील स्पर्धेमुळे आणि शिक्षकांच्या उदासीन भूमिकेमुळे शाळेची पटसंख्या कमी होऊ लागली. शाळेला घरघर लागली. गावातील अनेक विद्यार्थी आणि पालकांना शाळा बंद होते की काय? याची चिंता लागल्याने ग्रामस्थ व पालक यांनी शाळेमध्ये लक्ष घालून शाळा सुधारण्याचा प्रयत्न केला.
या प्रश्नातून शाळेला चांगले शिक्षक मिळावे म्हणून संस्थेशी संवाद साधला. या माध्यमातून मागील दोन वर्षांपूर्वी विजय लोहार आणि आणखीन एका शिक्षकाची बदली या शाळेमध्ये करून घेतली. शाळेमध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत असताना संस्थेने या शिक्षकांची बदली केल्यामुळे पुन्हा शाळा बंद पडण्याच्या स्थितीमध्ये असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे.
शिक्षक विजय लोहार यांना याच शाळेत ठेवा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. संस्थेच्या अंतर्गत राजकारणामुळे शिक्षक विजय लोहार यांची बदली केल्याची भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेटला कुलूप लावले आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून शाळेतील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंतीही केली आहे.
शेणोली ग्रामपंचायत सरपंच संतोष कणसे, ग्रामस्थ, पालक यांनी मुख्याध्यापक वसंत निकम यांना निवेदन दिले आहे. शिक्षक विजय लोहार यांची बदली रद्द करावी, अशी भूमिका घेतली असून, बदली रद्द न झाल्यास विद्यार्थी व पालक शाळा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List