पापाचा घडा भरला की, नियती सोडत नाही; ओमराजे निंबाळकर यांची मस्साजोगला भेट
सत्ता, पैसा यांचा माज आल्यानंतर आपलं कुणी वाकडं करूच शकत नाही. हा अर्विभाव जेव्हा येतो, तेव्हा अशा घटना घडत असतात. मात्र, पापाचा घडा भरला की नियती कुणाला सोडत नसते, असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. त्यांनी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे. इतका नीचपणाचा कळस कधी पाहिला नाही. पुरोगामी महाराष्ट्राला ही शोभत नाही, असे ते म्हणाले.
अशा प्रसंगातून मी देखील गेलो आहे. 2006 साली माझ्या वडिलांचा खून झाला होता. ते दुःख, ती आग काय असते याचे मी शब्दात वर्णन करू शकत नाही. माझ्या वडिलांची अशीच क्रुर हत्या झाली होती. आज १८ वर्षे उलटून गेले. अजूनही प्रकरण सेशन कोर्टात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या द्विस्तरीय चौकशीबाबत निंबाळकर म्हणाले की माझ्या वडिलांचा 2006 साली खून झाला, अद्यापही ते प्रकरण कोर्टात सुरू आहे. या पद्धतीने न्याय मिळणे कठीण आहे. कुटुंबातील व्यक्तीची अशी हत्या झाल्यानंतर काय दुःख असते ती आम्ही भोगलं आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्रुर आहे. या घटनेने आपण कुठे राहतोय, पुरोगामी महाराष्ट्र म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे का असा प्रश्न निर्माण होतो.
अशा घटनांमधील कुटुंबाचा तळतळाट गुन्हेगारांना लागतो. परमेश्वर आणि नियती त्यांना सोडत नाही. त्यांना याचे परिणाम निश्चित भोगावे लागणार आहेत. यातील गुन्हेगार कितीही मोठा असला तरी शासन नावाच्या यंत्रणेने तो शोधून त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे, असेही निंबाळकर म्हणाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List