वरळीतील पूनम चेंबर्समध्ये भीषण आग, आदित्य ठाकरे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
वरळीतील ॲनी बेझंट रोडवरील पूनम चेंबर्स सीएचएस या व्यावसायिक इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. सात मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी 11.00 च्या सुमारास आगीची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या जवानांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला.
“आग लागली होती, पण कोणतीही जीवितहानी झाली नाही ही चांगली बातमी आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत,” असे ठाकरे म्हणाले.
आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. अग्नीशमन दलाने तात्काळ आग विझवण्यासाठी आणि इतर मजल्यांवर पसरू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी अग्नीशमन दलासह स्थानिक पोलीस, बेस्ट, 108 रुग्णवाहिका, वॉर्ड कर्मचारी यासह आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List