गोराईत तातडीने स्मशानभूमी बांधा, समुद्र किनाऱ्यावर चिता रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ – मिलिंद नार्वेकर
बोरिवली पश्चिमेकडील गोराई गावात हिंदू स्मशानभूमी नसल्याने मृत्यूनंतर मानवी देहाची हेळसांड होत आहे. नाइलाजास्तव समुद्रकिनारी चिता रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे तिथे तातडीने स्मशानभूमी उभारण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आज विधान परिषदेत केली.
बोरिवली पश्चिमेकडील गोराई गावात आजमितीपर्यंत हिंदू स्मशानभूमी बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील सुमारे तीन हजार नागरिक आजही हिंदू स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने गोराईच्या जुईपाडय़ापासून जवळच असलेल्या डोंगराच्या बाजूला तात्पुरती स्मशानभूमी बांधली होती. परंतु या ठिकाणी अंत्यविधीसाठी कर्मचारी नाहीत. लाकडे, पथदिवे आणि पाण्याचीदेखील सोय नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या स्मशानभूमीपर्यंत कोणतेही वाहन थेट नेता येत नसल्याने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना तारेवरची कसरत करावी लागते. समुद्राला भरती असेल तर ओहोटी येईपर्यंत पार्थिव किनाऱ्यावर ठेवून वाट पहावी लागते, असे भयंकर वास्तव नार्वेकर यांनी मांडले.
संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालनाचे नूतनीकरण करा
संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले, त्यांचा इतिहास भावी पिढीलाही ज्ञात व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून दादर येथील शिवाजी पार्कातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील वास्तूमध्ये ‘संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालना’ची उभारणी करण्यात आली. या स्मृती दालनाचे उद्घाटन 30 एप्रिल 2010 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. हे स्मृती दालन सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यासह देश-विदेशातील हजारो पर्यटकांनी दालनास भेट दिली होती. या दालनाची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. दालनाच्या भिंतींना बुरशी आली असून सर्वत्र कुबट वासाचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी प्लास्टरची पडझड झाली आहे. संयुक्त महाराष्ट्र हा विषय प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने शासनाने तातडीने या स्मृती दालनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List